१ मेला साताऱ्यात निसर्गोत्सवाचा जल्लोष

लाल-केशरी बहरात रंगणार ‘गुलमोहर डे’

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रखरखत्या उन्हाळ्यात बहुतांश वृक्षांची पाने गळून निसर्ग कोमेजल्यासारखा वाटत असताना लाल-केशरी फुलांनी डवरलेला गुलमोहर मात्र सातारकरांना नवचैतन्याचा संदेश देत असतो. याच निसर्गसौंदर्याचा उत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्यात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औचित्याने ‘गुलमोहर दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निसर्गाशी असलेले सातारकरांचे भावनिक नाते अधोरेखित करणारा हा उपक्रम आता शहराच्या सांस्कृतिक ओळखीचाच अविभाज्य भाग बनला आहे.

प्रसिद्ध चित्रकार सागरनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून १९९९ मध्ये या अनोख्या उपक्रमाची सुरुवात झाली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ साताऱ्यात ही परंपरा अखंड सुरू असून, सेंट थॉमस चर्च परिसर, सदरबाजार तसेच शहरातील प्रमुख गुलमोहर वृक्षांच्या सान्निध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन, फोटोग्राफी उपक्रम, संगीत सादरीकरण आणि पर्यावरण संवर्धनाशी निगडित उपक्रमांमुळे या उत्सवाला वेगळी ओळख मिळाली आहे.

यंदाही ‘गुलमोहर डे २०२६’ निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता चिमुकल्यांच्या हस्ते झाडांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता भव्य चित्रकला स्पर्धा, नऊ वाजता चित्रकार विजय टिपुगडे यांचे प्रात्यक्षिक, साडेनऊ वाजता लाईव्ह संगीत, नृत्य सादरीकरण आणि सुलेखनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. सायंकाळी पाच वाजता कवी संमेलन आणि बक्षीस वितरण सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या उपक्रमात कलाकार, कवी, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. हा उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा ठरत आहे. वाढत्या शहरीकरणाच्या काळात वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

उन्हाळ्याच्या कडक झळांमध्ये लाल-केशरी फुलांनी बहरलेले गुलमोहर वृक्ष साताऱ्याच्या रस्त्यांना वेगळे सौंदर्य बहाल करतात. त्यामुळे ‘गुलमोहर दिन’ हा आता केवळ एक कार्यक्रम न राहता साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे प्रतीक बनला आहे.

निसर्ग, कला आणि पर्यावरणाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कबीर गायकवाड केले आहे.

error: Content is protected !!