देशविदेशातील शिखरचढायांची दखल; शनिवारी वितरण

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती घराण्याचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेत लोकोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी स्थापन झालेल्या शाहुनगरी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा दुसरा महाराणी येसूबाई पुरस्कार साताऱ्याची ‘अजिंक्य कन्या’ धैर्या विनोद कुलकर्णी हिला जाहीर झाला आहे. फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
धैर्या ही साताऱ्यातील वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी व प्राथमिक शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची कन्या आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ट्रेकिंगची आवड जोपासणाऱ्या धैर्याने प्रशिक्षक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आई – वडिलांच्या प्रोत्साहनातून सुप्रसिद्ध गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांच्या कॅम्पमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिच्या साहसी प्रवासाला नवी दिशा मिळाली.
पालकांशिवाय वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तिने १७,५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील १९,३४१ फूट उंच किलीमांजारो शिखर, महाराष्ट्रातील कळसुबाई तसेच युरोप खंडातील सर्वोच्च शिखर सर करून साताऱ्याचे नाव उज्ज्वल केले. गिर्यारोहणाबरोबरच गायन, बुद्धिबळ, रायफल शूटिंग आणि मॅरेथॉन स्पर्धांमध्येही तिने प्रावीण्य मिळवले आहे.या बहुआयामी कामगिरीची दखल घेत धैर्या कुलकर्णी हिला शाहुनगरी फाऊंडेशनचा दुसरा महाराणी येसूबाई पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना प्रदान करण्यात आला होता.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.