तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची संग्राम बर्गे यांची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाढत्या उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असतानाच विलासपूर परिसरातील वारंवार विस्कळीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंदिरानगर, डॉ. बापूजी साळुंखे नगर आणि राधिकानगर परिसरात दररोज तब्बल बारा-बारा तास वीजपुरवठा ठप्प राहत असल्याने नागरिकांचे हाल होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ऐन उन्हाळ्यात पंखे, कूलर आणि पाण्याच्या मोटारी बंद पडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये घरामध्ये थांबणे कठीण होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने महावितरणच्या सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संग्राम बर्गे यांनी प्रशासनासमोर नागरिकांच्या व्यथा मांडताना तीव्र नाराजी व्यक्त केली. कडक उन्हाळ्यात नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी झगडावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी महावितरणने त्वरित पर्यायी व्यवस्था उभी करावी,अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
दरम्यान, कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी या समस्येची गंभीर दखल घेत चार दिवसांत ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी विजय बोबडे, नितीन भोसले, संजय चव्हाण, गणेश नलवडे, अमित साजणे, प्रदीप चौगुले, गोविंद नलवडे, श्रीकांत बुरुंगले, निशांत तवटे आणि रोहन भोसले उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.