‘हर घर तिरंगा’मुळे देशप्रेम द्विगुणित होईल : शिवेंद्रसिंहराजे

साताऱ्यात नागरिकांना तिरंगा ध्वजांचे वाटप

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय असल्याचा अभिमान आणि आनंद प्रत्येकाच्या मनात आहे. देशावरील हे प्रेम आणखी वृद्धिंगत व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून या अभियानात सहभागी व्हावे. ‘हर घर तिरंगा’मुळे देशप्रेमाची भावना अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याच्या उद्देशाने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ सातारा शहरातील मोती चौक येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात एक हजार तिरंगा ध्वजांचे वाटप करून करण्यात आला.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “तिरंगा हा केवळ आपला राष्ट्रध्वज नाही, तर देशाची एकता, अखंडता आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण तिरंगा आपल्याला करून देतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्राप्रती असलेला अभिमान व्यक्त करावा.”

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह घराघरांत पोहोचविण्याबरोबरच नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, भाजपचे सातारा विधानसभा मतदारसंघप्रमुख अविनाश कदम, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मंडल अध्यक्षा वैशाली टंगसाळ, अविनाश खर्शीकर, मारुती चिकणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, सातारा नगरपालिकेचे सभापती व नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!