जोरमध्ये आदिवासी अस्मितेचा जागर

संस्कृती-परंपरेच्या उत्सवाला उदंड प्रतिसाद

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जोर (ता. वाई) येथील आदिवासी पाड्यावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जागर करण्यात आला. कोळी महादेव मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यानिमित्ताने समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडले.

कार्यक्रमात आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाबाबत जागृती करण्यात आली. बदलत्या काळात आदिवासी समाजातील नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्नांची आवश्यकता असल्याचा सूर यावेळी उमटला.

दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे केवळ आदिवासी दिनापुरते लक्ष न देता त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाने सातत्यपूर्ण आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

समाजाची एकजूट आणि सांस्कृतिक ओळख जपत शिक्षण व विकासाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम करण्याचा संकल्प कार्यक्रमात करण्यात आला.

याप्रसंगी संदिप सपकाळ, अनिल धानवले, किसन सपकाळ, समिर यादव, संतोष यादव, अविनाश यादव, गणेश यादव, किरण यादव, सखाराम यादव, राम कदम, विनोद यादव, शिवाजी यादव, निलेश यादव यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!