कुलकर्णी, वेताळ, माळवदे, बर्गे, सय्यद, कांबळे,सारडा, जोशी, बागवान, पाटील यांचा समावेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा वारसा विविध क्षेत्रांत पुढे नेणाऱ्या दहा मान्यवरांना यंदाचा ‘मिसाल वतन से मुहब्बत की-२०२६’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. १५) सकाळी आठ वाजता साताऱ्यातील गेंडामाळ कब्रस्तान येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
या सोहळ्यास श्रीमंत छत्रपती रुद्रनील शिवेंद्रसिंहराजे भोसले, ॲड. दिलावर मुल्ला आणि स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व लेखक विनोद कुलकर्णी, हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ, माजी सैनिक शंकर माळवदे, ॲड. मनीषा बर्गे, शिक्षक जावेद सय्यद, प्रवीण कांबळे, माधव सारडा, वसंतशेठ जोशी, परवेज बागवान आणि डॉ. कौशिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे गेंडामाळ कब्रस्तानमध्ये चिरनिद्रा घेत असलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या-ज्या क्षेत्रांत समाजकार्य केले, त्याच क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आजच्या कर्तृत्ववान व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जाते. स्वातंत्र्ययोद्ध्यांचा त्याग, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने २०२५ पासून हा उपक्रम सुरू आहे.
स्वातंत्र्यसेनानी इम्तियाज मिर्झा मास्तर यांच्या लेखन, काव्य व शायरी क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनोद कुलकर्णी, स्वातंत्र्यसेनानी पैलवान उमर बाळूभाई खाटिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संतोष वेताळ, स्वातंत्र्यसेनानी इब्राहिम उमर फरास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शंकर माळवदे, स्वातंत्र्यसेनानी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॲड. मनीषा बर्गे, तर स्वातंत्र्यसेनानी मेहताब याकुब शेख मास्तर यांच्या शैक्षणिक योगदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ जावेद सय्यद यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसेनानी अब्दुल जब्बार हकीम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परवेज बागवान, स्वातंत्र्यसेनानी शेख काका इनामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माधव सारडा, स्वातंत्र्यसेनानी शफी शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसंतशेठ जोशी आणि स्वातंत्र्यसेनानी इस्माईल हकीम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवीण कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैद्यकीय क्षेत्रातील जनसेवेबद्दल डॉ. कौशिक पाटील यांचाही गौरव होणार आहे.
देशप्रेम म्हणजे केवळ सीमेवर लढणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, समाजासाठी आणि माणुसकीसाठी केलेले कार्यही राष्ट्रसेवेचेच रूप आहे, या व्यापक संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘मिसाल वतन से मुहब्बत की-२०२६; उदाहरण आदर्श देशप्रेमाचे, प्रेरणा माणुसकीची’ या संकल्पनेतून होणाऱ्या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खिदमत-ए-खल्क व जमीयतुल उलमा वल हुफ्फाज, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.