रात्रगस्तीवरील पोलिसांवर सशस्त्र हल्ला

सुरूरमधील थरार; एकास अटक, अन्य फरार

भुईंज, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरूर येथे रात्रगस्तीवर असलेल्या पोलिस पथकावर संशयित दुचाकीस्वारांनी हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. क्रमांक नसलेली संशयास्पद दुचाकी थांबवून चौकशी करत असताना दुचाकीवरील व्यक्तींनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्यावर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात निंबाळकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यानंतर संशयित कच्च्या रस्त्याने दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूर येथील बाजारतळावर काही व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे पावणेएकच्या सुमारास रात्रगस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, सतीश कदम आणि होमगार्ड घटनास्थळी पोहोचले. तेथे असलेल्या व्यक्तींनी फलटण येथील काही जण त्यांना मारण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या माहितीची दखल घेत पोलिस पथक सुरूर येथील पारधी वस्तीकडे निघाले. त्यावेळी समोरून क्रमांक नसलेली संशयास्पद दुचाकी येताना दिसली. पोलिसांनी दुचाकी थांबवून त्यावरील व्यक्तींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणत हल्ला केला. त्याचवेळी पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्या डाव्या हातावर शस्त्राने वार करण्यात आला. संशयितांना पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र ते दुचाकीवरून कच्च्या रस्त्याने पसार झाले.

या घटनेप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे तसेच पोलिस कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने शस्त्राने हल्ला करून दुखापत केल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याला या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

error: Content is protected !!