बार बंद करण्यासाठी १५ ऑगस्टचा ‘अल्टिमेटम’

विलासपूरच्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विलासपूर-गोडोली येथील गजानन प्राईड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत सुरू झालेले मद्यविक्री (बिअर बार) केंद्र तातडीने बंद करावे, या मागणीसाठी स्थानिक महिला आणि नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नगरसेवक फिरोज पठाण आणि नगरसेविका पूनम निकम यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. संबंधित व्यवसायासाठी देण्यात आलेल्या सर्व शासकीय परवान्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. १५ ऑगस्टपूर्वी केंद्र बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पठाण यांनी दिला. दरम्यान, संबंधित विभागाला आवश्यक कारवाईचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

गजानन प्राईड सहकारी गृहनिर्माण संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत असून, संस्थेच्या इमारतीमध्ये ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे चार विभाग आहेत. ‘ए’ विभागातील पुनर्विकसित दुकान गाळ्यांपैकी गाळा क्रमांक एक आणि दोनमध्ये मद्यविक्री केंद्र सुरू करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी संस्थेची कोणतीही मान्यता, पूर्वपरवानगी अथवा संमती घेण्यात आलेली नाही. तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सभासदांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आक्षेपही निवेदनातून नोंदविण्यात आला आहे.

संबंधित ठिकाणी मद्यविक्री केंद्र सुरू होण्यापूर्वीच संस्थेच्या वतीने संबंधित शासकीय विभागांना लेखी स्वरूपात हरकत कळविण्यात आली होती. तरीही केंद्र सुरू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या, अनुज्ञप्ती आणि प्रमाणपत्रांची संबंधित विभागांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दुकान गाळ्यांमध्ये मंजूर बांधकाम नकाशापेक्षा अनधिकृत बदल व बांधकाम करण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्याची तपासणी करून अनधिकृत बांधकाम आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच गजानन प्राईड आणि गजानन गार्डन या दोन्ही निवासी संकुलांमध्ये प्रत्येकी सुमारे ४५ सदनिका आहेत. येथे मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास असून महिला, लहान मुले, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांचा सातत्याने वावर असतो. परिसरात धार्मिक स्थळे असून जवळच शाळाही आहे. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या या भागात मद्यविक्री केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती महिला आणि नागरिकांनी व्यक्त केली.

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासमोर सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि महिलांनी परिसरातील वस्तुस्थिती मांडली. नगरसेवक फिरोज पठाण आणि नगरसेविका पूनम निकम यांनीही नागरिकांच्या आक्षेपांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक कारवाईचे आदेश देण्यात येतील, असे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

दरम्यान, हा केवळ माझा विरोध नाही. परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांची येथे मद्यविक्री केंद्र नको, अशी स्पष्ट भूमिका आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कारवाई करावी. प्रशासनाने नागरिकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी मागणी पठाण यांनी केली.

विलासपूरमधील निवासी भागात यापुढे अशा प्रकारच्या मद्यविक्री व्यवसायांना परवानगी देऊ नये, अशी भूमिकाही पठाण यांनी मांडली. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरासमोरील एका ठिकाणीही मद्यविक्री व्यवसायासाठी परवानगी मागण्यात आल्याचा दावा करत, तेथेही परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.प्रशासनाने १५ ऑगस्टपूर्वी या प्रकरणात ठोस कारवाई करावी, अशी मागणी करत पठाण यांनी आक्रमक भूमिका घेतली. मागणीची दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देतानाच त्यांनी आत्मदहनाचाही इशारा दिला.

यावेळी प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका पूनम निकम यांच्यासह परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नागरिकांच्या आक्षेपानंतर आता मद्यविक्री केंद्राच्या परवानग्यांची चौकशी करून संबंधित विभागाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे विलासपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!