‘महाराणी येसूबाई’ पुरस्काराने धैर्या कुलकर्णी सन्मानित

गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीचा गौरव

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शाहूनगरी फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा ‘महाराणी येसूबाई’ पुरस्कार यंदा साताऱ्यातील तरुण गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी हिला प्रदान करण्यात आला. अल्पवयातच गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विविध शिखरे सर करणाऱ्या धैर्याच्या जिद्द, चिकाटी आणि धाडसाचा यावेळी गौरव करण्यात आला.

फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. वृषालीराजे भोसले म्हणाल्या, “साताऱ्याची भूमी शौर्य आणि पराक्रमाची परंपरा जपणारी आहे. हीच परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून धैर्या कुलकर्णीची निवड त्यासाठी योग्य ठरली आहे.”

पुरस्कार सोहळ्यात धैर्याला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. धैर्याच्या वतीने तिची आई, शिक्षिका ज्योती कुलकर्णी आणि वडील वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी नगरसेवक शंकर माळवदे, सुशांत मोरे, कल्याण राक्षे, महेश घाग, अमर कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, (कै.) चंद्रलेखाराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्किट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही याच कार्यक्रमात पार पडला. या स्पर्धेत ‘रंगपंढरी’ नाट्य संस्थेच्या ‘गेला भारत कुण्या गावा’ या सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला. ‘वैभवदीप’ (सोलापूर) यांना द्वितीय, ‘समर्थ’ (सातारा) यांना तृतीय, तर ‘थिएटर’ (सोलापूर) यांना चतुर्थ क्रमांक मिळाला. ‘नारी सर्वात भारी’ या सादरीकरणाला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.

अभिनय विभागात रोहित लगाडे (सोलापूर) यांना सर्वोत्तम पुरुष अभिनयाचा, तर रुचा पवार (पुणे) हिने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी तर प्रास्ताविक शंकर माळवदे यांनी केले. सुशांत मोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!