‘भूमिशिल्प’च्या बातमीची पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उष्माघाताच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क राहणे अपेक्षित असताना, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील निष्काळजीपणाचा ‘भूमिशिल्प’ने उघड केलेला प्रकार जिल्ह्यात खळबळ उडवणारा ठरला आहे. कार्यालयीन वेळेत वैद्यकीय अधिकारी संगणकावर ‘बुद्धीच्या खेळात’ (बुद्धिबळ) गुंतल्याबाबत ‘झेडपीच्या आरोग्य विभागाची ‘बुद्धी’ भलतीकडे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन हलले असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ना. देसाई यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे आरोग्य विभागातील शिथिल कारभारावर आता खरोखरच लगाम बसतो का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्य शासन उष्माघात टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवत असताना जिल्हा स्तरावरच असा बेजबाबदारपणा उघड होणे अत्यंत गंभीर मानले जात आहे. शासकीय संगणकांवर खेळांसारखी ॲप्लिकेशन वापरली जाणे ही केवळ शिस्तभंगाची बाब नसून, प्रशासनातील नियंत्रण यंत्रणेतील त्रुटी उघड करणारी बाब ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘भूमिशिल्प’च्या बातमीची तातडीने दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशीचे आदेश दिल्याने प्रशासन हलले असले, तरी प्रत्यक्षात दोषींवर किती कठोर कारवाई होते आणि भविष्यात अशा निष्काळजीपणाला कायमचा आळा बसतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
You must be logged in to post a comment.