कराड दक्षिणच्या मतदारयादीवरून जुंपली

पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले यांचे दावे-प्रतिदावे

कऱ्हाड, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कऱ्हाड दक्षिणमधील २०२४ च्या विधानसभा लढतीची राजकीय धग अद्याप कायम असून, आता मतदारयादीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार अतुल भोसले यांच्यात नवा राजकीय कलगीतुरा रंगला आहे. मतदारसंघात तब्बल ५६ हजार ११८ संशयित दुबार नोंदी आढळल्याचा दावा करत चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले; तर ‘प्रत्यक्ष दुबार मतदार केवळ ४ हजार ५२८ आहेत,’ असे सांगत भोसले यांनी त्यांचा दावा फेटाळला. त्यामुळे ‘संशयित नोंदी ५६ हजार की दुबार मतदार ४ हजार ५२८?’ हा मुद्दा आता कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

कऱ्हाड येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत समोर आलेल्या नोंदींची आकडेवारी मांडत प्रशासनासह निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर रविवारी भोसले यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत चव्हाण यांच्या आरोपांचे खंडन केले. त्यामुळे दोन दिवसांत दोन पत्रकार परिषदा आणि दोन वेगवेगळ्या आकडेवारीमुळे नेमकी वस्तुस्थिती काय, हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे.

चव्हाण म्हणतात, ‘५६,११८ दुबार नोंदी

चव्हाण यांच्या दाव्यानुसार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात ३ लाख १५ हजार ४२० मतदार होते. सध्या सुरू असलेल्या विशेष पुनरीक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या पडताळणीत तब्बल ५६ हजार ११८ संशयित दुबार नोंदी आढळल्या. त्यापैकी २७ हजार ६०९ नोंदी मतदारसंघांतर्गत, तर २८ हजार ५०९ नोंदी शेजारील पाच विधानसभा मतदारसंघांशी संबंधित असल्याचा त्यांचा दावा आहे.

शेजारील मतदारसंघांबाबतही चव्हाण यांनी स्वतंत्र आकडेवारी मांडली. कऱ्हाड उत्तरमध्ये ६ हजार ६३, इस्लामपूरमध्ये ६ हजार ४१२, शिराळ्यात ७ हजार ९७६, पाटणमध्ये ४ हजार १०० आणि पलूस-कडेगावमध्ये ३ हजार ९६२ अशा एकूण २८ हजार ५०९ संशयित नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, ‘या ५६ हजार ११८ दुबार नोंदींपैकी प्रत्येक नोंद बोगसच आहे, असा आमचा दावा नाही,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. एकाच नावाच्या वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात. त्यामुळे प्रत्येक नोंदीची प्रशासनाने स्वतंत्रपणे पडताळणी करून दुबार, तिबार किंवा अपात्र नोंदी असल्यास त्या वगळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

निवडणुकीपूर्वीच प्रशासनाला सांगितले होते

या प्रकाराकडे विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रशासनाचे लक्ष वेधले होते, असा दावा चव्हाण यांनी केला. २८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी होत असल्याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, त्यावेळी अपेक्षित कार्यवाही झाली नाही. आता निवडणूक झाल्यानंतर दुबार व अपात्र नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूरमधील पक्षाच्या बैठकीत मतांमध्ये दहा टक्के वाढ करण्याचे आवाहन केल्याचा संदर्भ देत चव्हाण यांनी भाजपवरही निशाणा साधला. ‘अचानक एवढी मते कशी वाढणार? मतदार काय आभाळातून पडणार आहेत का?’ असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या कथित ‘मतचोरी’च्या मुद्द्याचाही त्यांनी उल्लेख केला. या संदर्भातील माहिती आणि पुरावे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

भोसले यांचा प्रतिदावा; ‘दुबार केवळ ४,५२८’

चव्हाण यांच्या आरोपांनंतर रविवारी आमदार अतुल भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले. ‘कऱ्हाड दक्षिणमध्ये ५६ किंवा ५८ हजार दुबार मतदार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात दुबार मतदारांची संख्या केवळ ४ हजार ५२८ आहे. ही आकडेवारी प्रांत कार्यालयाकडे उपलब्ध असून कोणीही खातरजमा करावी,’ असे आव्हान त्यांनी दिले.

भोसले यांच्या माहितीनुसार, विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदारसंघात ३ लाख ३ हजार २०२ मतदार होते. त्यापैकी सुमारे २ लाख ६७ हजार १२१ मतदारांची गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. यामध्ये २२ हजार २६३ कायमस्वरूपी स्थलांतरित, ७ हजार ६९५ मयत, १ हजार ५५४ अनुपस्थित आणि ४ हजार ५२८ दुबार मतदार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थलांतरित, मयत, अनुपस्थित आणि दुबार अशा वेगवेगळ्या श्रेणींतील नोंदी एकत्र करून त्या सर्वच दुबार मतदार असल्याचा अर्थ काढणे चुकीचे आहे, अशी भूमिका भोसले यांनी मांडली. अधिकृत आकडेवारी प्रांत कार्यालयाकडून घेतल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

मतदारवाढीचेही भोसले यांच्याकडून गणित

कऱ्हाड दक्षिणमधील मतदारवाढ अस्वाभाविक असल्याचा आरोपही भोसले यांनी फेटाळला. देशातील मतदारवाढीचा दर साधारण आठ टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगत त्यांनी मागील निवडणुकांची तुलना केली.

२००९ ते २०१४ या काळात कऱ्हाड दक्षिणमध्ये २३ हजारांहून अधिक म्हणजे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक मतदार वाढले. २०१४ ते २०१९ दरम्यान सुमारे १३ हजार म्हणजे पाच टक्क्यांच्या आसपास, तर २०१९ ते २०२४ या काळात सुमारे २५ हजार अर्थात ८.९२ टक्के मतदारवाढ झाली. त्यामुळे २०२४ पूर्वी झालेली वाढ देशातील सर्वसाधारण मतदारवाढीशी सुसंगत असल्याचा दावा भोसले यांनी केला.

जिंकलात तेव्हा ईव्हीएम ठीक होते?

२०२४ मधील पराभवासाठी मतदार नोंदणी प्रक्रियेला जबाबदार धरण्यावरूनही भोसले यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली. ‘निवडणुकीत निवडून येता आले नाही म्हणून मतदार प्रक्रियेवर आक्षेप घेणे योग्य नाही. जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे,’ असे ते म्हणाले.

ईव्हीएमच्या मुद्द्यावरूनही त्यांनी चव्हाण यांना लक्ष्य केले. ‘२०१४ मध्ये तुम्ही निवडून आलात, तेव्हाही ईव्हीएम होते. २०१९ मध्ये निवडून आलात, तेव्हाही ईव्हीएम होते. मग त्या वेळी ईव्हीएममध्ये गैरप्रकार नव्हता का? पराभव झाला की ईव्हीएम आणि मतदार प्रक्रियेवर संशय घ्यायचा, हे योग्य नाही,’ असा सवाल त्यांनी केला.

आकड्यांमागची वस्तुस्थिती काय?

दरम्यान, चव्हाण आणि भोसले यांनी मांडलेल्या आकडेवारीतच लक्षणीय तफावत असल्याने हा वाद आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही. चव्हाण ५६ हजार ११८ ‘संशयित नोंदीं’ची पडताळणी करण्याची मागणी करीत आहेत, तर भोसले अधिकृत प्रक्रियेत प्रत्यक्ष ‘दुबार’ म्हणून समोर आलेल्या नोंदी केवळ ४ हजार ५२८ असल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर २०२४ मधील एकूण मतदारसंख्येबाबतही दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या आकड्यांत फरक आहे.

त्यामुळे आता या राजकीय दावे-प्रतिदाव्यांपलीकडे निवडणूक प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जाहीर करून नेमक्या किती नोंदी संशयित आहेत, त्यापैकी किती दुबार आहेत, किती मतदार स्थलांतरित किंवा मयत आहेत आणि अंतिम पुनरीक्षणानंतर प्रत्यक्षात किती नावे वगळली जाणार आहेत, हे स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष पुनरीक्षण पूर्ण झाल्यानंतर समोर येणारी अंतिम मतदारयादीच चव्हाण-भोसले यांच्या दाव्यांमधील वास्तव स्पष्ट करणार आहे.

error: Content is protected !!