‘कोयने’चा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता

पाणलोटातील संततधार पावसाने आवक वाढली

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढत असून, सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी (दि. १६) सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे सांडव्यावरून १९ हजार ५३५ क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक असा एकूण २० हजार ५८५ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

रविवारी सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी २१५७ फूट ६ इंच होती. धरणात ९७.५० टीएमसी म्हणजे ९२.६४ टक्के पाणीसाठा झाला असून, १८ हजार ९६३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे २८, नवजा येथे ४५, तर महाबळेश्वर येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास सांडव्यावरील विसर्ग आणखी वाढविला जाऊ शकतो, असे कोयना सिंचन विभागाने स्पष्ट केले आहे. वाढत्या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये आणि संबंधित ग्राम प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!