जिल्ह्यात विना पास कोणीही येणार नाही : ना. देसाई


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमारेषेवर कुणीही विना पास आत येवू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तरीही नागरिक पास नसतानाही जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कुणीही विना पास प्रवेश करणार नाही यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणेनी  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रवेश होणार्‍या प्रत्येक नाक्यावर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावावेत अशा सूचना करुन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पुढे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे विनाकारण गाडीवरुन फिरणार्‍यावर कारवाई करावी. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर अधिक  कडक अंमलबजावणीसाठी करावा. कुणीही विना पास जिल्ह्यात प्रवेश करणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
error: Content is protected !!