सनई-तुतारींचा निनाद, झेंडूच्या तोरणांनी सजलेला अजिंक्यतारा, पालखी सोहळ्यात महिलांचा सन्मान

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर या वर्षीचा स्वाभिमान दिन अत्यंत शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. तुतारींचा निनाद, सनईचे मंजुळ स्वर आणि गुरुकुल स्कूलच्या बँड पथकाच्या आकर्षक सादरीकरणामुळे वातावरण शिवमय झाले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराजांच्या मानाच्या पालखी सोहळ्याची सुरूवात झाली. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मंगळाईचे आणि श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन किल्ल्यावर भक्तीमय वातावरणात स्वाभिमान दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
श्री शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने गेली १४ वर्ष सातारा स्वाभिमान दिनाचा उपक्रम आयोजित करण्यात येत असून याही वर्षी हा दिन साजरा करण्यात आला. किल्ले अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीला सकाळी ७:३० वाजता प्रारंभ झाला.

या मिरवणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे, डॉ. संदीप काटे, डॉ. संदीप श्रोत्री, सागर भोसले, शेखर मोरे पाटील, सचिन जगताप, मनोज देशमुख, गोरख जाधव, दीपक भुजबळ, रविराज गायकवाड, शेखर मोरे- पाटील, रवी पवार, अमित बडदे, ॲड. प्रशांत नलावडे, मंगेश काशिद, पत्रकार सुजित आंबेकर, डॉ. संदीप महिंद गुरुजी, अविनाश कोळपे, संतोष शेडगे, अमित बडदे, दीपक भुजबळ, अजय जाधवराव, अभियंता द्विग्विजय गाढवे, शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल पुरोहित, जायंट्स सहेली ग्रुपच्या अंजली शिंदे, युवा ॲकॅडमीचे विद्यार्थी आणि वेद ॲकॅडमीचे विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सहभाग होता.
गुरुकुल स्कूलचा बॅड पथक, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनादात एनसीसी कॅडेटचे विद्यार्थ्यांच्या संचालनात हा पालखी सोहळा मंगळाई मंदिरात पोहोचला. तेथे मंगळाई देवीचे दर्शन घेवून पुन्हा परत शंभू महादेवाचे दर्शन घेवून राजसदरेवर ही मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.

राजसदरेवर छत्रपती शाहु महाराजांच्या मूर्तीस अभिवादन
सातारा शहराचे संस्थापक छ. शाहु महाराज यांना राजसदरेवर त्यांच्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने आणि साताऱ्याच्या स्वाभिमान दिन म्हणून पुरोहितांच्या हस्ते विधीवत पद्धतीने मंत्रपठण करत राजेंद्र चोरगे यांच्यासह मान्यवरांनी छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन केले.

छत्रपती शाहु महाराजांचे कार्य मोठे : अमित बडदे
सातारा स्वाभिमान दिन किल्ले अजिंक्यताऱ्यावर साजरा होतोय. या दिनाचा परिपाक म्हणजे याच परिसरात रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यांनी शाश्वत असे एक स्वप्न पाहिले होते. हिंदवी स्वराज्याचा झंझावात त्यांनी मांडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तत्व मांडले तेच छत्रपती शाहु महाराजांनी आचरणात आणले होते. १२ जानेवारी १७०८ ला शाहू महाराजाच्या राज्यभिषेक झाला. तो एक दूरगामी विचारातूनच. ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केला त्याचप्रमाणे छत्रपती शाहु महाराजांनीही राज्याभिषेक केला होता. त्यांना पुण्यश्लोक अजातशत्रू असे म्हटले जाते. औरंगजेब हा पाताळयंत्री होता. त्याला आलमगिर म्हणणे चुकीचे आहे तो त्याने छत्रपती शाहु महाराजांना कैदेत जीवंत ठेवले. मराठे चालून आले तर त्या भितीपोटी तसेच मराठा साम्राज्यात दुफळी माजवण्याचा हेतू त्याचा होता. पण छत्रपती शाहु महाराजांच्यामुळे ते त्याला साध्य करता आले नाही. छत्रपती शाहु महाराजांनी साताऱ्यात बसून दिल्लीचा बादशाह ठरवला होता. ते कुशल संघटक होते. जेव्हा, दिल्लीवर इराणचा बादशाह चालून आला तेव्हाच त्याने लिहिलेल्या पत्रात छत्रपती शाहु महाराजांचा उल्ल्लेख हिंदूनृपती असा आहे. म्हणून त्याचे कार्य जगभर पसरले आहे, असे इतिहासकार अमित बडदे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सुनिल मोरे-पाटील यांनी केले. स्वागत सुदामदादा गायकवाड यांनी केले तर कल्याणी गायकवाड यांच्या गितांनी कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.

गेल्या १४ वर्षापासून उपक्रम!
छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास कुठे सांगितला गेला नाही तो सांगता यावा म्हणून शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने गेल्या १४ वर्षांपासून सातारा स्वाभिमान दिन आयोजित करण्यात येतो. हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांचा इतिहास किती लपला गेला आहे याचे उदाहरण म्हणजे केबीसीत छत्रपती शाहु महाराजांच्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देता आले नाही. प्रेक्षकांमध्येही त्याचे उत्तर देता आले नव्हते. एक्सपर्टला उत्तर देता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचे नातू शाहू महाराज यांचा सांभाळ करणाऱ्या झेबुनिसा यांच्या नावाने साताऱ्यात मशिदी आहेत. हेही अजून अनेकांना माहिती नाही, असेही शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर यांनी सांगितले.
छ. शाहु महाराजांचा इतिहासाची पारायणे केली पाहिजेत
शिवस्वराज रथयात्रा दि. १५ रोजी राजधानी साताऱ्यातून काढण्यात येणार आहे. त्या यात्रेमध्ये सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन करत ते म्हणाले, छत्रपती शाहु महाराजांचा इतिहास लपला गेला आहे. त्यांचा इतिहास सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी पारायणे केली पाहिजेत. अजय जाधवराव यांच्यासारख्या अभ्यासकांची व्याख्याने आयोजित केली पाहिजेत, असेही निक्षून मराठा बिझनेस फोरमचे मनोज देशमुख यांनी सांगितले.
राजधानी सातारा असा नामोल्लेख करावा!
ज्या छत्रपती शाहु महाराजांनी सातारा नगरी वसवली त्याच छत्रपती शाहु महाराजांचे स्मरण म्हणून आजपासून याच दिवसापासून आपण संकल्प करुयात की सातारा नगरीचे नाव राजधानी सातारा असे करुयात. तसा उल्लेख करुयात. आज आपण पाहतो. अहमदनगरचे नाव बदलले, औंरगाबादचे नाव बदलले, तसेच नाव साताऱ्याला राजधानी सातारा असे संबोधूयात, त्याला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पत्रकार सुजित आंबेकर यांनी केले.
इतिहास घडवला पाहिजे!
स्वाभिमान दिनाचे हे १४ वे वर्ष आहे. हा उपक्रम नुसता सुरु केला नाही तर त्याचे सातत्य शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीने ठेवले आहे. उपक्रमाचे सातत्य ठेंवणे हे मोठे दिव्य आहे. छत्रपती शाहु महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे. त्यांच्या विचारांची काळाची गरज आहे. त्यांचे विचार समाजापुढे गेला पाहिजे. केवळ इतिहासात गुरफटून न जाता नवा इतिहास घडविला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय यावर मोठं काम झालं पाहिजे, नवीन पिढीला बलदंड करण्यासाठी योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, असे मत बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केले.

गुणी जणांचा सन्मान!
लक्ष्मी टेकडी येथील वैमानिक प्रियांशू रणदिवे, रायफल शुटींगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला रणवीर परदेशी, एसपीजी कमांडो कालिदास पवार, मराठा लाईफ इन्फंट्रीचे सेवानिवृत्त कॅप्टन डी. के. मोरे, दुचाकीवरुन ४ लाख ३१ हजार किलोमीटरचा प्रवास करणारे विकास शिंदे, कोंडवे गावची गायिका कल्याणी गायकवाड, गडकिल्यांचे अभ्यासक डॉ. संदिप क्षोत्री, जायंट्स साहेली ग्रुपच्या नयना कांबळे, अंजली शिंदे, सह्याद्रीच्या लेकी ग्रुपच्या मेघा नलवडे, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोलीपकर, उद्योजिका अंजना जठार, अभिनेत्री भक्ती झणझणे, शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी समिंद्रा जाधव, मिनी ऑलिंपिक गोल्ड मेडलिस्ट सानिका सांगवान, खेळाडू स्वप्ना चव्हाण, युवा करिअर अकादमी विश्वास मोरे, किल्लेदार मोरेश्वर कांबळे, राजुशेठ राजपुरोहित, अथर्व निकम, ओंकार चव्हाण मुधोजी गायकवाड, श्रीकांत सकुंडे, सोमनाथ साळुंखे, अभिजित जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती शाहु महाराजांचा जाज्वल्य इतिहास!
छ. शाहु महाराजांच्या इतिहासाचा वाचक आहे. त्यांचे कार्य खूप मोठं आहे. छ. संभाजी महाराजांचे ज्या औरंगजेबाने हाल हाल करुन मारले त्याच औरंगजेबांलाही छ. शाहु महाराजांनी बेहाल करुन मारुन आपला बदला घेतला. तोही साताऱ्यातून याच किल्ले अजिंक्यताऱ्यावरुन सुत्रे हलवून. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. यवन, पोर्तेगिज, डज, ब्रिटीश असे परंतु त्या सर्वांत पोतुर्गिज हे अतिशय क्रू वागायचे. त्यांनाही लगाम छ. शिवाजी महाराजांनी लावला. गोव्यात छ. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांनी देवीच्या मंदिराची मोडतोड केली होती. त्याच मंदिराचा जिर्णोद्धा छ. शिवाजी महाराजांनी केला होता. आताही त्याच मंदिराचा जीर्णोध्दार दोन वर्षापुर्वी मंत्री शिवेंद्रराजे यांनी केला आहे.
- इतिहासकार अजय जाधवराव
सातारा स्वाभिमान दिनाच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढणार!
जे छ. शिवाजी महाराजांच्या विचारावर कार्य करतात ते सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचे आहेत, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीने गेली १४ वर्ष हा सातारा स्वाभिमान दिन साजरा करण्याचा उपक्रम आता पुढील वर्षापासून विस्तृत स्वरुपात वाढवला गेला पाहिजे. आदल्या दिवशी छत्रपती शाहु महाराजांच्या विचारांवर एक व्याख्यान होईल, आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या विचारांचा जागर होईल.
- डॉ. संदीप महिंद गुरुजी, इतिहासाचे गाढे अभ्यासक

You must be logged in to post a comment.