उत्तेश्वर यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत तराफा सेवा : उपमुख्यमंत्री शिंदे

जलपर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातील ग्रामदैवत उत्तेश्वर यात्रेनिमित्त मंगळवारी (दि. १४) भाविकांसाठी कोयना जलाशयावर मोफत तराफा वाहतूक सेवेची घोषणा केली आहे. दोन दिवसांच्या दरे दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे स्थानिक ग्रामस्थ आणि यात्रेला येणाऱ्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे दरवर्षी उत्तेश्वर यात्रेसाठी येत असतात. रविवारी दुपारी त्यांचे दरे येथे कुटुंबीयांसोबत हेलिकॉप्टरमधून आगमन झाले. हेलिपॅडवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, उत्तेश्वर यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत तराफा सेवेची सोय केली असून, ही सेवा १४ आणि १५ जानेवारी दरम्यान उपलब्ध राहणार आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

जलपर्यटनाच्या विकासावर भर

राज्यातील धरणक्षेत्र आणि जलाशयांमधील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकार नियोजनबद्ध पावले उचलत आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जलपर्यटनाच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री शिंदे हे या दौऱ्यावेळी जावळी तालुक्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यासह नवीन महाबळेश्वर प्रकल्प, कोयनेचे पर्यटन यावरही चर्चा करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर पर्यटन प्रकल्पाला चालना

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साताऱ्यात नव्या प्रकल्पांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागठाणे येथील एमएसआरडीसीचे कार्यालय हलवून महाबळेश्वर येथे केंद्रस्थानी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!