वयोवृद्ध पत्रकारांचा सन्मान; घरीच मिळणार अधिस्वीकृती पत्रिका

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत अध्यक्ष हरिष पाटणे यांचा क्रांतिकारक निर्णय

पुणे,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पत्रकारांच्या सन्मानासाठी व ज्येष्ठ पत्रकारांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी वयोवृद्ध पत्रकारांना त्यांच्या घरी जाऊन अधिस्वीकृती पत्रिका देण्याचा क्रांतिकारक निर्णय पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान होणार असून पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक सोमवारी पुण्यात अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे, समिती सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, सुनीत भावे, आणि पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर उपस्थित होते. यावेळी सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील पात्र प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि त्यांना मंजुरी देण्यात आली.

माहितीचा फलक लावण्याचे निर्देश

पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी आवश्यक नियम, अटी आणि प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती देणारा फलक तयार करून तो पुणे विभागातील सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील माहिती कार्यालयांमध्ये तसेच पुणे उपसंचालक कार्यालयात लावण्याचे निर्देश समितीने दिले. या फलकामुळे पत्रकारांना आवश्यक माहिती एकाच ठिकाणी मिळेल आणि प्रक्रियेत सुसूत्रता येईल.

साताऱ्यात भव्य पत्रकार मेळाव्याचे नियोजन

साताऱ्यातील सुसज्ज जिल्हा पत्रकार भवनामध्ये सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील अधिस्वीकृती धारक पत्रकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देत अध्यक्ष हरिष पाटणे यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यात पत्रकारांच्या समस्या, सन्मान आणि भविष्यकालीन विकासावर सविस्तर चर्चा होणार आहे.

या बैठकीत पत्रकारांच्या सन्मान व हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने घेतलेले हे निर्णय पत्रकारांच्या हक्कांसाठी मैलाचा दगड ठरतील असा विश्वास यावेळी समितीच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला.

वयोवृद्ध आणि ज्येष्ठ पत्रकारांना घरीच अधिस्वीकृती पत्रिका देण्याचा निर्णय त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा सन्मान आहे. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने घेतलेला हा क्रांतिकारक निर्णय पत्रकारितेच्या सन्मानासाठी महत्त्वाचा ठरेल आणि पत्रकारिता क्षेत्राला नवा आयाम मिळेल.

  • हरिष पाटणे, अध्यक्ष, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती.
error: Content is protected !!