महाबळेश्वरमधील अतिक्रमणप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक

उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन; कारवाई न झाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाचा इशारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): महाबळेश्वर बाजारपेठेत बेकायदेशीर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या समस्येला आता तीव्र वळण लागले आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत कारवाईसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पँथर सेनेच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची दरे गावी भेट घेऊन ही मागणी केली.

महाबळेश्वरमधील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर

महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे होत असून, त्यामुळे स्थानिक व्यापारी, नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत. यापूर्वी तहसीलदार आणि महाबळेश्वर नगरपालिकेला आजअखेर चार वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शिंदेंकडून तातडीच्या कारवाईचे आदेश

उपमुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातील दरे येथे यात्रेनिमित्त आले असताना, सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी महाबळेश्वरमधील समस्येचे गांभीर्य स्पष्ट करत तातडीच्या उपाययोजनेची मागणी केली. यावर शिंदेंनी तातडीने लक्ष देऊन तहसीलदार आणि महाबळेश्वर मुख्याधिकारी यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

आंदोलनाचा इशारा

दरम्यान, प्रशासनाने जर लवकरात लवकर अतिक्रमणविरोधात कारवाई केली नाही, तर ऑल इंडिया पँथर सेना थेट मंत्रालयाबाहेर मोठ्या आंदोलनाची तयारी करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हा पँथर सेनेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्यासह तालुकाध्यक्ष, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!