‘भूमिशिल्प’च्या वृत्तांतानंतर पालकमंत्र्यांचे पाठपुराव्याचे आश्वासन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सर्वसामान्यांचे आरोग्यमंदिर असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे आणि पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सकाचा प्रश्न आता पुन्हा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे जाणार आहे. महिनाभरापूर्वी आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी महिनाभरात मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मात्र या विषयाचा आपल्याकडून पाठपुरावा झाला नसल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. आता सिव्हिलमधील सद्यस्थितीची माहिती घेऊन आरोग्यमंत्र्यांकडे पुन्हा पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘सिव्हिलला कायमचा कॅप्टन कधी मिळणार?’ या मथळ्याखाली ‘भूमिशिल्प’ने जिल्हा रुग्णालयातील वास्तव मांडत पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सकासह रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. जिल्ह्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेल्या सिव्हिलमध्ये पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक नसल्याने प्रशासकीय कारभारावर परिणाम होत असून, विविध संवर्गातील पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावरही ताण वाढत असल्याकडे वृत्तातून लक्ष वेधण्यात आले होते.
याच वृत्ताच्या अनुषंगाने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. सिव्हिल हे सर्वसामान्यांचे आरोग्यमंदिर आहे; मात्र रुग्णालयाला पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक नाही आणि मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. याबाबत पालकमंत्री म्हणून आपण काय करणार? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला.
त्यावर पालकमंत्री देसाई यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या प्रश्नांबाबत झालेल्या या बैठकीत रिक्त पदांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. तसेच एमबीबीएससह आवश्यक डॉक्टरांची सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यासाठीही परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महिनाभरात मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे त्या बैठकीत आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. रिक्त पदांचा प्रश्न केवळ साताऱ्यापुरता मर्यादित नसून राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांचा शासनस्तरावर आढावा घेण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर या विषयाचा आपल्याकडून स्वतंत्रपणे पाठपुरावा झाला नसल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.
‘भूमिशिल्प’ने निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात अद्याप ही परिस्थिती कायम असेल, तर संबंधितांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली जाईल. त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे या प्रश्नाचा पुन्हा पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
..आता निर्णयाची प्रतीक्षा
जिल्हा रुग्णालय हे केवळ सातारा शहराचे रुग्णालय नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ते मोठा आधार आहे. खासगी उपचारांचा खर्च न परवडणाऱ्या कुटुंबांसाठी सिव्हिलचे दरवाजे हीच आशा असते. त्यामुळे या रुग्णालयाला पूर्णवेळ नेतृत्व नसणे आणि आवश्यक पदे रिक्त राहणे हा केवळ प्रशासकीय प्रश्न न राहता थेट रुग्णसेवेशी जोडलेला विषय बनला आहे.
महिनाभरात मनुष्यबळ भरण्याचे आश्वासन यापूर्वीच देण्यात आले होते. आता पालकमंत्री देसाई यांनीही या प्रश्नाची माहिती घेऊन आरोग्यमंत्र्यांकडे पुन्हा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे सिव्हिलच्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष नियुक्त्या कधी होणार आणि सर्वसामान्यांच्या या आरोग्यमंदिराला पूर्णवेळ ‘कॅप्टन’ कधी मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
You must be logged in to post a comment.