सायकलभ्रमंती करताना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई शहरातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांचा अवघ्या २४ तासांच्या आत शोध घेण्यात वाई पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक वापर, तीन स्वतंत्र शोध पथकांची समन्वयाने राबविलेली मोहीम आणि डोंगर परिसरात रचलेल्या सापळ्यामुळे तिन्ही मुले सुखरूप मिळाली. समुपदेशनानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून या कामगिरीबद्दल वाई पोलिसांचे कौतुक होत आहे.
वाई पोलीस ठाण्यात १ ऑगस्ट रोजी तीन अल्पवयीन मुले पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र शोध पथके तयार करण्यात आली. एका पथकाने वाई शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली, तर अन्य दोन पथके अनुक्रमे मांढरदेवी आणि पाचगणी परिसरात रवाना करण्यात आली. तपासादरम्यान एमआयडीसीतील चांदणी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिन्ही मुले रस्त्याने जाताना दिसून आली. ही महत्त्वाची माहिती मिळताच सर्व शोध पथकांना बोपर्डी परिसरात शोधमोहीम केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर पोलिसांनी बोपर्डी, धावडी, लोहारे, सुलतानपूर, शेलारवाडी आदी गावांमध्ये जाऊन नागरिकांना मुलांचे छायाचित्र दाखवत शोधमोहीम तीव्र केली. दरम्यान, आयटीआय महाविद्यालय परिसरातील डोंगराच्या दिशेने तिन्ही मुले धावताना दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घालत सापळा रचला. पाठलाग करत डोंगराच्या पलीकडील रेणुसे वस्ती परिसरातून तिन्ही मुलांना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, तपासात ही तिन्ही मुले परस्परांचे मित्र असून सायकलवर फिरत-फिरत दूर निघून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कर्मचारी नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, विशाल येवले तसेच होमगार्ड इंद्रजित लाखे यांनी या शोधमोहीमेत सक्रिय सहभाग घेतला.
अपहरणाचा संशय फोल
तिन्ही मुले अपहरणास बळी पडली नसून मित्रांसोबत सायकलवर फिरत दूर गेल्याचे तपासात स्पष्ट झाले. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता शोधमोहीम हाती घेत अल्पावधीत त्यांचा शोध लावला. त्यामुळे एका संभाव्य गंभीर प्रकरणावर वेळीच पडदा पडला आणि पालकांनाही मोठा दिलासा मिळाला.
You must be logged in to post a comment.