फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांना निवेदन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विलासपूर-गोडोली येथील मुख्य रस्त्यावरील गजानन प्राईड सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या इमारतीत सुरू असलेल्या बिअर बारवर तातडीने कारवाई करून तो बंद करण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही लेखी आक्षेप नोंदवून संबंधित बिअर बारचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गजानन प्राईड सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुमारे ४० फ्लॅटधारक कुटुंबे वास्तव्यास आहेत. संबंधित बिअर बार हा सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारालगत आणि मुख्य रस्त्यावर असून, परिसरात बापूजी साळुंखे नगर, गणेश नगर, राधिका नगर आणि इंदिरा नगर या दाट लोकवस्तीच्या वसाहती आहेत. याच परिसरात शाळा, मंदिर तसेच महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने या बिअर बारमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी यापूर्वीही नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत नगररचना विभागाने संबंधित बिअर बार चालकाला नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी संघटित होत हा प्रश्न निर्णायकपणे लावून धरण्याचा निर्धार केला आहे.
माध्यमांशी बोलताना नगरसेवक फिरोज पठाण म्हणाले, दाट नागरी वस्तीच्या मध्यभागी अशा प्रकारचा बिअर बार सुरू राहणे कोणाच्याही हिताचे नाही. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा. जनभावनांकडे दुर्लक्ष करून हा बिअर बार सुरू ठेवू देणार नाही.
या विषयावर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, गरज पडल्यास सातारा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून नागरिकांची भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती पठाण यांनी दिली.
मी आणि नगरसेविका पूनम निकम हे या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसोबत ठामपणे उभे आहोत. विलासपूर-गोडोलीतील बिअर बार बंद करण्यासाठी लोकशाही मार्गाने आवश्यक तो संघर्ष करू. नागरिकांच्या इच्छेविरुद्ध हा बिअर बार सुरू राहू देणार नाही, असा निर्धार नगरसेवक फिरोज पठाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देताना नगरसेवक अविनाश कदम, गजानन प्राईड सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.