नागठाण्यातील कारवाईत २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड लपवून ट्रकमधून वाहतूक केला जात असलेला १७ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा बंदी असलेला गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने आज (सोमवारी) पहाटे नागठाणे (ता. सातारा) येथे जप्त केला. या धडक कारवाईत ट्रकसह २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस बंदी असलेल्या गुटख्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करून गुटखा तस्करांवर लक्ष केंद्रित केले होते.
दरम्यान, रविवारी उशिरा विश्वसनीय बातमीदारामार्फत सांगलीकडून पुण्याकडे एमएच १० झेड ४६९६ क्रमांकाच्या मालट्रकमधून बंदी असलेला गुटखा नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीची पडताळणी करून नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ सापळा रचण्यात आला. आज (सोमवारी) पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित ट्रक अडवून तपासणी करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत वाहनातील व्यक्तींनी ट्रकमध्ये चिरमुरे असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी सखोल पाहणी केली असता चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड कौशल्याने लपवून ठेवलेला विमल पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत ८९५.८ किलो वजनाचा गुटखा व पानमसाला, ज्याची किंमत १७ लाख ६५ हजार ९४० रुपये आहे, जप्त करण्यात आला. तसेच ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक जप्त करून एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी मच्छिंद्र आकाराम कांबळे (वय ५४, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली आप्पासाहेब खापणे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत गुटखा जप्त करण्यात आला असून, बोरगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात गुटखा चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड लपवून वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले असून, हा साठा नेमका कुठून आणला गेला, कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील तसेच पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, अमित झेंडे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अमित सपकाळ, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, किरण जगताप, लैलेश फडतरे, ओंकार यादव, अमित माने, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे दीपकुमार मांढवे, निलेश गायकवाड, सुनील कर्णे, जगदीश कणसे, विशाल जाधव, धीरज महाडीक, ज्ञानेश ढाणे, केतन जाधव आणि अमोल कणसे यांच्या संयुक्त पथकाने केली.
पुरवठा साखळी तपासाच्या केंद्रस्थानी
दरम्यान, जप्त करण्यात आलेला बंदी असलेला गुटखा नेमका कुठून आला, तो कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केला जात होता आणि सातारा-पुणे परिसरात कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या अवैध रॅकेटमधील इतर संबंधितांपर्यंत पोहोचण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
You must be logged in to post a comment.