कोयनेचा विसर्ग वाढवल्याने सावधगिरीचा इशारा

महसूल यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क

कोयनानगर,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी १० वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून वाढवून सहा फुटांपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे कोयना नदीपात्रात सांडव्यामधून ३२ हजार ७७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

याशिवाय कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे १ हजार ५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कोयना नदीतील एकूण विसर्ग ३३ हजार ८२६ क्युसेक इतका झाला आहे.

सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

धरणातून वाढीव प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीपात्र व नदीकाठच्या भागातील नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव नदीत उतरू नये, तसेच नदीकाठावरील गावांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. ग्रामप्रशासन, महसूल यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

  • नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे.
  • जनावरे व शेतीसाहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे.
  • नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
  • विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.
error: Content is protected !!