सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अस्तित्वाचा पुरावा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : काळ्या बिबट्याचे दर्शन अत्यंत दुर्लभ असले तरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेऱ्याने त्याच्या अस्तित्वाची नोंद नुकतीच केली आहे. सहजासहजी न दिसणाऱ्या या बिबट्यांची संख्या सह्याद्री पर्वतरांगांमधील घनदाट जंगलांत वाढत असल्याचा हा पुरावा आहे, असे मत वन्यजीव अभ्यासकांनी नोंदविले आहे.
काळा बिबट्या (ब्लॅक पँथर) ही वेगळी प्रजाती असल्याचा गैरसमज असला, तरी तो साधासुधा बिबट्याच आहे. जनुकीय बदलामुळे (मेलॅनिजम) त्याचा रंग काळा असतो, इतकेच! बिबट्याची एक मादी एकाच वेळी एका पिवळ्या आणि एका काळ्या बिबट्याला जन्म देऊ शकते, असेही अभ्यासक सांगतात. त्वचेवर अतिप्रमाणात असलेल्या काळ्या रंगद्रव्यामुळे (मेलेनिन) हा बिबट्या काळा दिसतो. या बिबट्याचा फोटो ‘झूम’ करून पाहिल्यास, पिवळ्या बिबट्यासारखीच फुलाफुलांची नक्षी त्याच्याही अंगावर असल्याचे दिसून येते. त्याच्या अधिवासाच्या पार्श्वभूमीशी मिळतीजुळती ही नक्षी बिबट्याला लपून राहण्यास आणि सावजाला गाफिल ठेवण्यास उपयुक्त ठरते. यालाच छद्मावरण असे म्हणतात. काळ्या बिबट्याच्या अंगावरील हे छद्मावरण मात्र अगदी जवळून पाहिल्याखेरीज लक्षात येत नाही.
पश्चिम घाटातील तिलारी, राधानगरी, रत्नागिरी परिसरात या काळ्या बिबट्याच्या अस्तित्वाच्या अनेक नोंदी आहेत. जास्त पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात त्याचा हा गडद रंग त्याला चांगले छद्मावरण प्रदान करतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साताऱ्याजवळ महामार्ग ओलांडताना दोन विविध घटनांमध्ये दोन बिबट्यांचा अज्ञात वाहनांच्या धडकेने मृत्यू झाला होता. त्यापैकी एक काळा बिबट्या होता, हे येथे उल्लेखनीय आहे. बिबट्यांचा नैसर्गिक भ्रमणमार्ग ठरलेला असतो आणि वर्षानुवर्षे ते त्या मार्गावरून भ्रमंती करत असतात. महामार्ग रुंदीकरणामुळे या मार्गात अडथळा निर्माण झाल्याचे या दोन बिबट्यांच्या मृत्यूमुळे समोर आले होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवन आत्यंतिक समृद्ध असून, अनेक लुप्तप्राय वनस्पती, पक्षी, उभयचर आणि सस्तन प्राणी या परिसरात मोठ्या संख्येने दिसून येतात. काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ वन्यजीव या परिसरात वारंवार आढळणे हा या परिसराच्या नैसर्गिक समृद्धीचा सुखावह पुरावा मानला जात आहे.
You must be logged in to post a comment.