निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करत झेडपी वादानंतर विधान भवनासह राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानसभा , विधान परिषदेसह राज्यभरात गाजला. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर ते काही काळ अर्जित रजेवर होते. अखेर राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले.
नवे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे २०१४ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी पुणे शहरात पोलीस उपायुक्त (गुन्हे) म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर व गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. पुणे गुन्हे शाखेत असताना ड्रग्स प्रकरणे, आंदेकर टोळीविरुद्ध कारवाई आणि गणेशोत्सव काळातील सुरक्षा व्यवस्थापनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर पुन्हा विश्वास निर्माण करणे, संवेदनशील घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि प्रशासनातील समन्वय साधणे या दृष्टीने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान, महाराष्ट्र राज्य गृह विभागाने सोमवारी (दि. २० एप्रिल) राज्यातील नऊ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीसह विविध जिल्ह्यांचा समावेश आहे.साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त (सुरक्षा) म्हणून बदली झाली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूर येथे नियुक्ती करण्यात आली असून, कोल्हापूरचे विद्यमान अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीवर गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून नियुक्ती झाली आहे.तसेच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे हे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक असतील. पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे, तर गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना पदोन्नतीने त्याच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.