जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शिपायास रंगेहात पकडले

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोनोग्राफी सेंटर, शासकीय मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र व कुटुंब नियोजन केंद्राच्या परवान्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनातील शिपाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जेरबंद केले. आनंदा गोपाळ वाळवेकर (वय ५८, रा. एस. पी. एस. कॉलेज मागे, सोनगाव, ता. सातारा) असे अटकेत असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या भागीदारीतील रुग्णालयात संबंधित वैद्यकीय सुविधा सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी शिपाई वाळवेकर याने तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या नावावरून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ९ मार्च २०२६ रोजी एसीबीचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे दाखल झाली होती.
तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने ९, १०, १३, १६, २५ व ३० मार्च तसेच १ व १५ एप्रिल अशा आठ टप्प्यांत पडताळणी केली. १६ मार्च रोजी पंचांसमक्ष लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १७ एप्रिल रोजी सापळा रचून वाळवेकर याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईमुळे सातारा जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘परवान्यासाठी लाच’ हीच पद्धत बनली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणात डॉ. युवराज करपे यांचे नाव समोर आले असून, त्यांच्यावर यापूर्वीच आरोग्य उपसंचालकांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी आनंदा वाळवेकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र) व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, पोलीस हवालदार गणेश ताटे, निलेश राजपूरे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम थोरात, नवनाथ शिंदे तसेच चालक पोलीस हवालदार महेश पुजारी यांचा सहभाग होता.
You must be logged in to post a comment.