हिशोब चुकवणाऱ्यांना सोडणार नाही : ना. एकनाथ शिंदे

साताऱ्यातील मेळाव्यात जिल्हा परिषद राजकारणावर शिंदेंचा जोरदार प्रहार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेले राजकारण हीन पातळीचे असून या यशवंत भूमीला ते कधीही मान्य होणार नाही, असा घणाघाती इशारा देत शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘मी स्वभावाने रोखठोक आहे, हिशोब चोख ठेवतो. आडवे आले तर सोडत नाही,’ असा थेट इशारा त्यांनी दिला.

गांधी मैदानावर आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख शरद कणसे, हरिभाऊ जगदाळे, जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले, युवासेना अध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

साताऱ्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले, ही यशवंत विचारांची भूमी आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा दृष्टा नेता या मातीत जन्माला आला. परंपरा आणि विकासाचा संगम असलेल्या या जिल्ह्यात झालेले गलिच्छ राजकारण जनता विसरणार नाही. जिल्हा परिषदेत घडलेल्या घटनांवर सध्या भाष्य टाळत असलो, तरी योग्य वेळी शिवसेनेचा ‘हिसका’ दाखवू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करताना शिंदे म्हणाले, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणी मालक-नोकर नाही. कार्यकर्त्यांच्या कुवतीनुसार पदे दिली जातात. गाव तेथे शिवसेना ही मोहीम राबवा, मतदार यादीवर लक्ष ठेवा. तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे. सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशाची कबुली देत, बहुमत असूनही अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडता आले नाहीत, ही खंत आहे, असे सांगितले. साताऱ्याला पर्यटन हब बनवण्यासाठी आराखडा तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका करत, खरी शिवसेना कोणती असा प्रश्न विचारणारे आता राजकारणातून हळूहळू संपत आहेत, असा टोला लगावला. साताऱ्यात आयटी पार्क आणि फलटण येथे ग्रामीण एमआयडीसी प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे सातारा शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी आपला राजीनामा मागे घेत शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दर्शवला. या मेळाव्यामुळे मात्र साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

error: Content is protected !!