नूतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा निर्धार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पोलीस हे समाजाचे प्रतिबिंब असतात. त्यामुळे नागरिकांचा विश्वास जिंकणे, पारदर्शकता राखणे आणि गुन्हेगारीविरुद्ध कठोर भूमिका घेणे हीच माझ्या कामाची त्रिसूत्री असेल, असा ठाम निर्धार साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी साताऱ्यातील पोलिसिंगची दिशा स्पष्ट केली.
गेल्या वीस महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हे शाखेत उपायुक्त (DCP) म्हणून कार्यरत असलेले पिंगळे यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी राज्यातील एका जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण आणि जिल्हा प्रशासन या दोन्ही पातळ्यांवरील अनुभव त्यांच्या कामाला बळ देणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगळे असतात. साताऱ्यातील सामाजिक रचना, ग्रामीण-शहरी समतोल, पर्यटन क्षेत्र आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन काम करावे लागेल, असे त्यांनी नमूद केले. वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारीचा मान राखत प्रामाणिक, निपक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसें गुन्हेगारीवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार असल्याचे सांगून सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांविरुद्धचे अत्याचार, मादक पदार्थांची साखळी आणि संघटित गुन्हेगारी या सर्वांवर लक्ष्यित कारवाई केली जाईल.
तपासाची गुणवत्ता वाढवून गुन्ह्यांची उकल वेगाने आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे करण्यात येईल. यासोबतच वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग, ग्रामीण भागातील वाद आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर विशेष मोहिमा राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कायदा अंमलबजावणीत कोणतीही तडजोड होणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
पोलिसिंग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘जनता दरबार’, थेट तक्रार निवारण यंत्रणा, सोशल मीडियाद्वारे संवाद आणि बीट पद्धती बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी तुषार दोशी यांनी नूतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे स्वागत करून त्यांच्याकडे कार्यभार सोपविला. यावेळी दोषी यांनी जिल्ह्यातील एकूण परिस्थितीबद्दलची माहिती पिंगळे यांना दिली.
You must be logged in to post a comment.