विलासपूरमधील शाळांतील ७० टक्के वर्ग डिजिटल; शालेय साहित्याचे वाटप

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी सुसंगत राहावेत, या उद्देशाने विलासपूर परिसरातील गोळीबार मैदान व इंदिरानगर येथील दत्तक जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ७० टक्के वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या असून उर्वरित वर्गखोल्याही लवकरच डिजिटल करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे यांनी केले.
विलासपूर (गोळीबार मैदान) येथील जिल्हा परिषद शाळेत संग्राम बर्गे मित्रपरिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

बर्गे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून गोळीबार मैदान आणि इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेऊन विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच इतर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शाळांना आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळावे, यासाठी दोन्ही शाळांतील सुमारे ७० टक्के वर्ग डिजिटल करण्यात आले असून उर्वरित वर्गखोल्यांचेही डिजिटलीकरण लवकरच पूर्ण करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, दरवर्षी यथाशक्ती विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, शालेय बॅग तसेच अन्य आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी संग्राम बर्गे मित्रपरिवाराचे कौतुक केले.
यावेळी निर्मल पवार, आबा शिंदे, दीपक सुतार, महेश चौगुले, विजय पवार, निलेश पाटील, गणेश नलवडे, यश सूर्यवंशी, बरकत बेग, कौस्तुभ शिंदे तसेच संग्राम बर्गे मित्रपरिवार उपस्थित होता.
You must be logged in to post a comment.