काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दशकांतील वर्चस्वाला पूर्णविराम

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी ५९३ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह खाशेराव जगताप यांना २९२ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार किशोर हणमंत धुमाळ यांना एकही मत मिळाले नाही. या विजयासह या मतदारसंघातून प्रथमच भाजपचा उमेदवार विधान परिषदेत निवडून आला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दशकांच्या वर्चस्वाला या निकालाने पूर्णविराम मिळाला आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अधिकृत निकाल जाहीर केला. एकूण ८९५ मतदारांपैकी ८९४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ८८५ मते वैध, तर ९ मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक असलेला ४४३ मतांचा कोटा धैर्यशील कदम यांनी पहिल्याच पसंतीत पार करत सहज विजय मिळवला.
मतमोजणी पारदर्शक आणि शांततेत
सांगली येथील तरुण भारत व्यायाम मंडळ इमारतीत सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूमचे सील उघडण्यात आले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर मतपत्रिकांचा ताळमेळ, सरमिसळ आणि मतमोजणीला प्रारंभ झाला.
पाच टेबलांवर मतमोजणी
मतमोजणीसाठी पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक शिपाई नियुक्त करण्यात आला होता. याशिवाय राखीव अधिकारी-कर्मचारी, रांग अधिकारी, हौद अधिकारी आणि टॅब्युलेशन पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण मतमोजणीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजपने रचला नवा इतिहास
या निकालामुळे सातारा-सांगलीच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला गेला आहे. या मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे विलासराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर घार्गे आणि काँग्रेसचे मोहनराव कदम यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ दीर्घकाळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र यावेळी भाजपने प्रथमच विजय मिळवत इतिहास रचला.
महायुतीचे गणित ठरले यशस्वी
निवडणुकीपूर्वी उपलब्ध संख्याबळानुसार भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्या महायुतीकडे सुमारे ५९० मतांचे संख्याबळ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्ष निकालाने हा अंदाज खरा ठरला आणि धैर्यशील कदम यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवला.
क्रॉस व्होटिंगची चर्चा कायम
धैर्यशील कदम यांचा विजय मोठा असला, तरी अभयसिंह जगताप यांना मिळालेली २९२ मते राजकीय विश्लेषणाचा विषय ठरली आहेत. महाविकास आघाडीच्या अपेक्षित संख्येपेक्षा अधिक मते मिळाल्याने काही प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पूर्णपणे संपलेली नसल्याचे संकेत या निकालातून मिळाल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी
यापूर्वी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी महायुतीतील घटक पक्षांमध्ये झालेला सत्तासंघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तास्थापनेत मित्रपक्षांतील मतभेद कायम असल्याची चर्चा होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सर्व मते एकत्र राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
साताऱ्याचे संख्याबळ ठरले निर्णायक
या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील ४७२ आणि सांगली जिल्ह्यातील ४२३ असे एकूण ८९५ मतदार होते. साताऱ्यातील तुलनेने अधिक संख्याबळ आणि भाजपची मजबूत संघटनात्मक ताकद धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी निर्णायक ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला नवे बळ
या विजयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक विस्ताराला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला मिळालेली मते आणि स्थानिक पातळीवरील बदलती राजकीय समीकरणे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सातारा-सांगलीच्या राजकारणाची दिशा बदलणारा निकाल म्हणून या विजयाकडे पाहिले जात आहे.
You must be logged in to post a comment.