उंब्रज, साखरवाडीत अपर तहसीलदार कार्यालये; ७ जुलैपर्यंत हरकती मागविल्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत फलटण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तर कराड तालुक्यातील उंब्रज आणि फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या तिन्ही कार्यालयांसंदर्भातील जाहीर सूचनेचे मसुदे प्रसिद्ध करण्यात आले असून, नागरिकांकडून ७ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतींवर विचार करून पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासंदर्भातील जाहीर सूचनेचा मसुदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कराड व फलटण उपविभागीय अधिकाऱ्यांनी उंब्रज आणि साखरवाडी येथील अपर तहसीलदार कार्यालयांबाबतही मसुदे प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
प्रस्तावानुसार फलटण हे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय राहणार असून, फलटण, माण आणि खटाव हे तीन तालुके या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. तर सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव आणि खंडाळा हे आठ तालुके विद्यमान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन निर्णयप्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर कराड तालुक्यातील उंब्रज येथे अपर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मसूर, कवठे, इंदोली, कराड, सैदापूर, मलकापूर, सुपने, कोळे, काळे, उंडाळे, कोपर्डे हवेली, येळगाव, शेणोली आदी महसूल मंडळांचा समावेश असून, एकूण १४ महसुली मंडळे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहेत. त्यामुळे कराड तालुक्याच्या पूर्व, दक्षिण तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली सेवांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे अपर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तरडगाव, आदर्की बुद्रुक, होळ, फलटण, कोळकी, बरड, आसू, राजाळे, गिरवी आणि वाठार निंबाळकर या एकूण १० महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे साखरवाडीसह परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध कामांसाठी फलटण शहरात वारंवार जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच महसुली सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे.
प्रस्तावित जाहीर सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, या तिन्ही कार्यालयांबाबत कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास त्या ७ जुलैपर्यंत संबंधित कार्यालयांकडे लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रशासकीय निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक परिणामकारक होण्याबरोबरच नागरिकांना दाखले, महसुली नोंदी, जमीनविषयक कामे आणि इतर प्रशासकीय सेवांसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे फलटण, उंब्रज आणि साखरवाडी परिसरातील नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
You must be logged in to post a comment.