राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय योजनांची जनजागृती

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सामाजिक न्याय दिन सातारा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य समता दिंडी काढून सामाजिक न्याय, समता आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
समता दिंडीला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यापूर्वी छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे उपस्थित मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दिंडीत सातारा शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध संचलन, ढोल-ताशांचा गजर आणि सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांमुळे दिंडीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामाजिक न्याय विभाग तसेच विविध विकास महामंडळांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे फलक होते. या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
समता दिंडीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाला.
यावेळी समाज कल्याण अधिकारी श्रोती रकटे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विकास महामंडळांचे प्रतिनिधी तसेच सातारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.