धरणांमधील गाळ तातडीने काढावा : खा. उदयनराजे

लोकसहभागातून गाळमुक्ती मोहीम राबवण्याच्या सूचना

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने सर्व धरणांतील गाळ तातडीने काढण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाटबंधारे विभाग आणि राज्य शासनाकडे केली आहे. ही मोहीम लोकसहभागातून राबवून स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी धरणातील गाळ मोफत नेण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की, यंदा मान्सूनने अपेक्षित गती घेतलेली नाही. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसून, अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला असून, अनेक धरणे उघडी पडल्याचे चित्र आहे.

सध्या जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा ४४ धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सुमारे २० टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासह सिंचन आणि वीजनिर्मितीबाबतही गंभीर चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाणीसाठा केवळ आठ टक्क्यांवर आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

धरणांमध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. सध्या धरणे उघडी पडल्याने गाळ काढण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत, प्रशासनाने सर्व धरणांचा समन्वित आराखडा तयार करून एकाचवेळी गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गाळ काढण्याच्या कामात स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना शेतीसाठी हा गाळ नेण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे धरणांची साठवण क्षमता वाढण्याबरोबरच शेतजमिनीची सुपीकता वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यासमोरील पाणीटंचाईचे संकट गांभीर्याने ओळखून प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. आज केलेली गाळमुक्ती भविष्यातील जलसाठा वाढविण्यास उपयुक्त ठरेल. संकट मोठे असले तरी नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून त्यावर मात करणे शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!