नेत्यांचे फ्लेक्स हटविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

भूमिशिल्पच्या वृत्ताची तातडीने दखल; निवडणूक विभागाकडून कारवाईचे आदेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काळात सातारा शहरात झळकणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांसह डिजिटल फ्लेक्स बोर्डांची निवडणूक विभागाने गंभीर दखल घेतली आहे. ‘आचारसंहितेतही रस्तोरस्ती झळकले नेत्यांचे चेहरे’ या मथळ्याखाली भूमिशिल्पने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर काही वेळातच सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना संबंधित फ्लेक्सबाबत कारवाई करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी बुधवारी (दि. १०) सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक–२०२६ साठी आदर्श आचारसंहिता लागू असल्याचा उल्लेख केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सांगलीसह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आचारसंहिता प्रभावी असताना सातारा शहरात विविध स्वरूपाचे डिजिटल फ्लेक्स बोर्ड झळकत असल्याचे निदर्शनास आले असून, ही बाब आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांना धरून नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सातारा शहरात शाहू चौक, पोवई नाका, जिल्हा परिषद चौक तसेच अन्य प्रमुख भागांत वाढदिवस शुभेच्छांच्या नावाखाली लोकप्रतिनिधींची छायाचित्रे असलेले फ्लेक्स , होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात झळकत असल्याची बाब भूमिशिल्पने वृत्तातून समोर आणली होती. या वृत्तानंतर काही वेळातच निवडणूक विभागाने दखल घेतल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रात शहरात झळकणाऱ्या डिजिटल फ्लेक्सबाबत नगरपरिषद प्रशासनाने कोणती कारवाई केली, याचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील आचारसंहितेच्या काळात झळकणाऱ्या फ्लेक्सबाबत आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

याशिवाय, आदर्श आचारसंहिता लागू असताना वाढदिवस शुभेच्छांच्या नावाखाली झळकणाऱ्या फ्लेक्सना नगरपरिषदेकडून परवानगी कशी देण्यात आली, तसेच त्यासाठी कोणते निकष लावण्यात आले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. निवडणूक विभागाच्या कारवाईनंतर संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकांनाही आदर्श आचारसंहितेच्या सर्व तरतुदी लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक ठिकाणांवरील दृश्यात्मक प्रसिद्धी आणि राजकीय स्वरूपाच्या उपक्रमांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील या फ्लेक्स प्रकरणात निवडणूक विभागाने सुरू केलेल्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

error: Content is protected !!