सातारा-सांगली विधान परिषदेसाठी शंभर टक्के मतदान

सर्व ८९५ मतदारांनी बजावला लोकशाहीचा हक्क

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत लोकशाहीबद्दलची जागरूकता आणि जबाबदारी अधोरेखित करणारे चित्र पाहायला मिळाले. मतदारसंघातील सर्व ८९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शंभर टक्के मतदानाची नोंद केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का शंभरावर पोहोचल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात आले.

सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभी मतदानाचा वेग तुलनेने संथ होता. सकाळी दहा वाजेपर्यंत अवघे २७ मतदारांनी मतदान केले होते. मात्र त्यानंतर मतदारांचा ओघ वाढत गेला. विविध मतदान केंद्रांवर लोकप्रतिनिधींनी नियोजनबद्ध पद्धतीने उपस्थित राहत मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढला आणि अखेर सर्वच ८९५ मतदारांनी मतदान केल्याने शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र अंतिम आकडेवारीमध्ये फरक पडू शकतो,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या मतदारसंघात सातारा व सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकांचे नगरसेवक आणि महानगरपालिकेतील नगरसेवक असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व असून, निकालाच्या दृष्टीने प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे.मतदान प्रक्रिया सर्व मतदान केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने निवडणूक यंत्रणेने समाधान व्यक्त केले.

आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद झाला आहे. येत्या २२ तारखेला होणाऱ्या मतमोजणीत या प्रतिष्ठेच्या लढतीचा निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्याकडे लागले आहे.

error: Content is protected !!