आचारसंहितेतही रस्तोरस्ती झळकले नेत्यांचे चेहरे!

नगरपालिका, निवडणूक विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून त्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाही सातारा शहरात लोकप्रतिनिधींची छायाचित्रे असलेले ‘वाढदिवस शुभेच्छा’ स्वरूपातील फ्लेक्स बोर्ड मोठ्या प्रमाणात झळकत असल्याने निवडणूक प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, या फलकांना नगरपालिकेकडून अधिकृत परवानगी देण्यात आल्याची माहिती पुढे येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी १८ मेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात प्रमुख लढत होत असल्याचे चित्र आहे.

अशा पार्श्वभूमीवर शहरातील शाहू चौक, पोवई नाका, जिल्हा परिषद चौक तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, शुभेच्छांच्या नावाखाली लोकप्रतिनिधींची मोठी छायाचित्रे असलेले फ्लेक्स बोर्ड , होर्डिंग्ज झळकत आहेत. निवडणूक काळात अशा दृश्यात्मक प्रसिद्धीची आचारसंहितेच्या चौकटीत तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाची असल्याने नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व इतर लोकप्रतिनिधी हेच मतदार आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट नेत्यांची दृश्यात्मक उपस्थिती निर्माण करणारे फलक अप्रत्यक्ष प्रभाव निर्माण करणारे ठरू शकतात, असा आक्षेप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकांनाही आदर्श आचारसंहितेच्या सर्व तरतुदी लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी पक्ष अथवा राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रभावाचा गैरवापर टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरील दृश्यात्मक प्रसिद्धी व राजकीय स्वरूपाच्या उपक्रमांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील फ्लेक्स प्रकरणाची निवडणूक विभागाकडून दखल घेतली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

आचारसंहिता लागू असताना अशा फ्लेक्स बोर्डांना परवानगी देताना निवडणूक विभाग अथवा आचारसंहिता कक्षाची पूर्वमान्यता घेण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

error: Content is protected !!