धोका कायम; मंगळवारीही शाळा बंद!

पाच तालुक्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आणि संभाव्य धोका कायम असल्याने महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवार दि. ६ जुलै रोजी या पाच तालुक्यांतील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, भारतीय हवामान विभागाचा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी मंगळवार, दि. ७ जुलै रोजीही सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांत नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून, दरडप्रवण व अतिधोकादायक भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथा आणि डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील काही मार्गांवर दरडी कोसळणे, भूस्खलन होणे तसेच संपर्क यंत्रणा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारनंतर मंगळवारीही शाळा बंद

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवार, दि. ६ जुलै रोजी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पावसाचा जोर आणि हवामान विभागाचा इशारा कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मंगळवार, दि. ७ जुलै रोजीही सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त अहवालांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित शाळा व महाविद्यालय प्रशासनाने आदेशाची तातडीने आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पर्यटनस्थळांवर प्रवेशाला लगाम

अतिवृष्टीच्या काळात धबधबे, तलाव, नदीकाठ आणि इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर गर्दी होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा ठिकाणी नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. अपघातप्रवण ठिकाणी ‘प्रवेश निषिद्ध’ आणि ‘धोकादायक क्षेत्र’ असे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.प्रमुख पर्यटनस्थळांवरील गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरडप्रवण भागातील नागरिकांना हलवा

पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये दरड कोसळणे व भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन अतिधोकादायक भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत. मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना आहेत.स्थलांतरित नागरिकांसाठी शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे आणि अन्य सुरक्षित इमारतींमध्ये तात्पुरती पुनर्वसन केंद्रे सुरू करून तेथे निवास, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पुलावर पाणी आल्यास रस्ता बंद

अतिवृष्टीच्या काळात घाटरस्त्यांवरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओढे, नाले आणि नद्यांना पूर आल्यास किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास संबंधित मार्ग तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.अशा ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यातून वाहने नेण्याचा किंवा बंद केलेल्या मार्गांवरून प्रवास करण्याचा धोका नागरिकांनी पत्करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यंत्रणा २४ तास ‘अलर्ट मोड’वर

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी मुख्यालयी उपस्थित राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.हवामानाचा अंदाज, धरणांमधील पाण्याचा विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीपातळी याबाबतची माहिती सोशल मीडिया, दवंडी, स्थानिक प्रसारमाध्यमे आणि व्हॉट्सॲप समुहांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

आदेश मोडल्यास कडक कारवाई

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ आणि शासनाच्या संबंधित परिपत्रकान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. धोकादायक पर्यटनस्थळांवरील निर्बंध किंवा अन्य आपत्ती व्यवस्थापन आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!