पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

अतिवृष्टीचा धोका; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने घाटमाथा व दुर्गम भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या तसेच शासकीय, निमशासकीय आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार, दि. ६ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि दुर्गम भागात सोमवारपासून मंगळवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी तालुक्यांत सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांमधून आणि नदी-नाल्यांमधून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील काही मार्गांवर दरडी कोसळण्याचाही धोका निर्माण झाला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यास विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व माध्यमांच्या शाळांना आदेश लागू

हा आदेश संबंधित पाच तालुक्यांतील सर्व माध्यमांच्या शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांना लागू राहणार आहे. अंगणवाड्या आणि बालवाड्यांचाही सुट्टीच्या आदेशात स्पष्टपणे समावेश करण्यात आला आहे. संबंधित शाळा प्रशासनांनी आदेशाची तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रशासन अलर्ट मोडवर

जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदार, शिक्षण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भाग, घाटमार्ग, नदी-नाले आणि दरडप्रवण परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

error: Content is protected !!