सातारा, कऱ्हाड आणि वाई तालुक्यातील काही भागांचाही समावेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि दुर्गम भागात गुरुवारी (दि. ९) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील अतिसंवेदनशील भागांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. संबंधित शिक्षकांनी मात्र नियमित वेळेनुसार शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाज करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड, जावळी, सातारा आणि वाई या सहा तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांमधून तसेच नदी-नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. संबंधित तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अनेक भागांत पाणी साचले असून, ग्रामीण व दुर्गम मार्गांवर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नदी-नाल्यांना पूर येण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टीचा निर्णय घेतला आहे.
‘या’ भागांतील शैक्षणिक संस्था राहणार बंद
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील अधिकारांचा वापर करून सुट्टीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार महाबळेश्वर, पाटण आणि जावळी या तीन संपूर्ण तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्था गुरुवारी बंद राहणार आहेत.
याशिवाय कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे, सुपने, इंदोली आणि येळगाव, सातारा तालुक्यातील कण्हेर, अंबवडे, दहिवड आणि परळी, तर वाई तालुक्यातील पसरणी आणि धोम या महसुली मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांनाही एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार असल्या, तरी संबंधित शिक्षकांना सुट्टी देण्यात आलेली नाही. शिक्षकांनी नियमित वेळेनुसार शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज तसेच आवश्यक प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सुट्टीच्या आदेशाची संबंधित शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने तातडीने व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
You must be logged in to post a comment.