विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुलाला वाचवताना आई-वडील अन् बहिणीचाही अंत; फलटण तालुक्यातील खामगाववर शोककळा

फलटण, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : घराजवळील लोखंडी तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरला… मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी आई-वडील धावले; त्यांनाही विजेने कवेत घेतले. डोळ्यांसमोर आई-वडील आणि भाऊ विजेच्या धक्क्यात अडकल्याचे पाहून बहिणीनेही त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली आणि क्षणार्धात तिचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ८) पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटण तालुक्यातील खामगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून खामगाववर शोककळा पसरली आहे.

सचिन सतीश शिंदे (वय २६), सतीश ऊर्फ पिसुराड्या किसन शिंदे (वय ४५), गंगू सतीश शिंदे (वय ४०) आणि आरती सतीश शिंदे (वय २४, सर्व रा. खामगाव, ता. फलटण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सचिन शिंदे यांच्या घरावरून जाणाऱ्या केबलला आधार देण्यासाठी लावण्यात आलेली बाइंडिंग वायर महावितरणच्या विद्युत तारेला घासत होती. या घर्षणामुळे विद्युत तारेचे आवरण कट होऊन विद्युत प्रवाह ताण देण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेत उतरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही लोखंडी तार सचिन यांच्या हातात आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

विजेचा धक्का बसल्याने सचिन ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून वडील सतीश शिंदे आणि आई गंगू शिंदे यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, सचिन यांना सोडविण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विद्युत प्रवाह असलेल्या लोखंडी तारेचा जोरदार धक्का बसला. क्षणार्धात तिघेही विजेच्या प्रवाहात अडकल्याचे पाहून सचिन यांच्या पत्नी शीतल शिंदे यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी लोखंडी तारेला हात न लावता काठीच्या मदतीने ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी सचिन यांची बहीण आरती शिंदे तेथे आली. आई-वडील आणि भाऊ विजेच्या धक्क्यात अडकल्याचे पाहताच तिने त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, घाईत तिने विद्युत प्रवाह असलेली लोखंडी तार हाताने पकडल्याने तिलाही जोरदार विजेचा धक्का बसला. सचिन यांच्या पत्नी शीतल यांनी हातातील काठीच्या मदतीने सर्वांना विद्युत प्रवाहापासून बाजूला केले. मात्र, तोपर्यंत चौघेही बेशुद्ध होऊन खाली कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत वडील, आई, मुलगा आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

पहाटेच्या शांततेत घडलेल्या या घटनेने खामगाव हादरून गेले. काही क्षणांत एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चार जणांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन यांच्या पत्नी शीतल शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र अकस्मात मृत्यू नोंदी करण्यात आल्या आहेत. अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७५/२०२६, ७६/२०२६, ७७/२०२६ आणि ७८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी तातडीने पोलीस यंत्रणा घटनास्थळी रवाना केली. फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ आणि फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह पुरेसे पोलीस मनुष्यबळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांना पोलीस प्रशासनाने आवश्यक मदत केली. रूढी-परंपरेनुसार अंत्यविधी पार पाडण्यासाठीही पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना सहकार्य केले.

या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

error: Content is protected !!