सातारा, कोरेगाव एमआयडीसीसाठी भरीव निधी..!

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र विकास औद्योगिक कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी १४ कोटी ९१ लाख १३ हजार ३०० रूपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी ६० लाख ९७ हजार रूपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी कडून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती एमआयडीसीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. 

सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले ,सातारा जिल्ह्यात अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती.तीच गरज ओळखून आमच्या विभागाचे उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई ,एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र व कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी आम्ही प्रयत्नशील होतो.या प्रयत्नांना यश आले असून सातारच्या केंद्रासाठी १४ कोटी ९१ लाख १३ हजार ३०० रूपयांची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.या केंद्रातंर्गत अग्निशमन वाहने ,इमारत बांधकाम ,कर्मचाऱ्यांसाठी घरे आदी सोयीसुविधा राबवल्या जाणार आहेत.

आपत्कालीन प्रसंगावेळी या अग्निशमन केंद्राचा फायदा सातारा परिसरासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे.कोरेगाव येथील मिनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली होती.ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.त्यामुळे याठिकाणच्या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी ६० लाख ९७ हजार रूपयांची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.या निधीमुळे रस्त्याची दुरूस्ती होऊन चांगले रस्ते तयार होणार आहेत.  सातारा व कोरेगाव एमआयडीसीच्या कामांचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते सातारा मँन्युफँक्चरींग असोशिएशन (मास)चे अध्यक्ष उदय देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्याकडे देण्यात आले.

error: Content is protected !!