सातारकरांनी फक्त आकडेच मोजत बसायचं का..?


प्रशासकीय अधिकाऱ्यांनो, ‘आधी कोरोनाला घालवा
मग मंत्र्यांची शाबासकी मिळवा !’

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मार्च महिन्यातील 23 तारखेला जिल्ह्यात पहिले दोन कोरोना रुग्ण आढळले आणि त्या दिवसापासून दोनाचे चार, चाराचे आठ असा वाढत वाढत हा आकडा इतका वाढला की 99 व्या दिवशी हा आकडा हजारावर जाऊन पोचला.आजअखेर ही संख्या 1361 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजना पाहाता हा आकडा कमी होत जाणं अपेक्षित असताना तो दिवसेंदिवस वाढतच का चाललाय, याचं उत्तर आज प्रशासनाकडंही नाही. त्यामुळं ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशी अवस्था झालेल्या सातारकर जनतेसमोर मात्र रोज-दररोज किती पॉझिटिव्ह आढळले आणि किती जणांना प्राण गमवावे लागले याचे आकडे मोजत बसण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच शिल्लक
राहिलेला नाही.


होम क्वारंटाईन नावाला, धोका साऱ्या गावाला !
‘संस्थात्मक अलगीकरण’, ‘होम क्वारंटाईन’ हे शब्द जणू इतिहासजमा झालेत की काय असं वाटू लागलंय. अगदी सुरुवातीला म्हणजे पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या लॉकडाऊन काळात ज्या गांभीर्यानं या गोष्टींचं पालन केलं गेलं तितक्याच निष्काळजीपणानं पुढील चौथ्या-पाचव्या लॉकडाऊन काळात या गोष्टींचा फज्जा उडवला गेला. आता तर लॉकडाऊनमध्ये अनलॉक सुरू झाल्यानं या शब्दांना सर्वांनी खुंटीला टांगून ठेवलंय की काय, असं वाटू लागलंय. नागरिकांना या गोष्टींचं महत्त्व राहिलं नाही आणि प्रशासनाला त्याचं गांभीर्य उरलं नाही. कोरोना काही गेलेला नाही उलट तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय हे कळत असूनही ‘प्रशासन उदास आणि जनता बिनधास्त’ अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

वाढता वाढता वाढे…
एकूण सहा लॉकडाऊनचा कालावधी मोजल्यास आज (सोमवार, 6 जुलै) लॉकदाऊनचा 106 दिवस. जिल्ह्यात आजअखेर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1361 इतकी असून 55 जणांना या कोरोनापायी आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चाललाय. या 106 दिवसांत ‘शून्य पॉझिटिव्ह’ अशी दिलासा देणारी बातमी अवघे दोन दिवस सातारकरांच्या वाट्याला आली आहे नाहीतर रोज-दररोज जिल्ह्यात कुठं ना कुठं तरी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतच आहेत.

कागदावरचे आदेश प्रत्यक्षात कधी येणार ?
‘आम्ही ह्याव करू,’ ‘आम्ही त्याव करू,’ हे असं नुसतं बोलून हा कोरोना काही हटणार नाही, हे आमच्या प्रशासनाच्या लक्षात कधी येणार ? मोठमोठे मंत्री जिल्ह्यात येऊन लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करा असा आदेश देतात याचा अर्थ ते जिल्ह्यात येण्यापूर्वी नियम कडक पाळले जात नव्हते का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं लॉकडाऊन नियमांचं काटेकोर पालन कागदोपत्री आदेशात गुंडाळून न ठेवता ते प्रत्यक्ष कसे अमलात येतील याकडं लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आज ना उद्या हा कोरोना साताऱ्याची पाठ सोडेल आणि पुन्हा एकवार हा सातारकर मोकळा श्वास घेण्यासाठी मुक्तपणे संचार करेल, असा दिवस लवकरात लवकर उजाडावा, ही अपेक्षा !


मंत्र्यांचे दौरे… प्रशासनाचे हार-तुरे !
गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री यांच्यासह ज्येष्ठ-वरिष्ठ नेत्यांनी विविध आढावा बैठकांच्या माध्यमातून जिल्हा वाऱ्या काय केल्या प्रशासनानं हार-तुऱ्यांसह त्यांच्यासमोर कागदी घोडे नाचवून आपली पाठ थोपटून घेतली. विविध विभागांत समनव्य राखून प्रशासन चांगलं काम करत असल्याचं वाक्य गृहराज्यमंत्र्यांच्या तोंडून काय निघालं सारं प्रशासन एकदम हुरळून गेलं. जणू जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाल्याचं ‘सर्टिफिकेट’ मिळाल्याचा टेंभा मिरवत प्रशासनदेखील ‘आमचं कामच लई भारी’ असं मिरवू लागलं… पण जिल्ह्यातील कोरोनाविषयक खरंखुरं चित्र काही और आहे…






error: Content is protected !!