सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात ‘आत्मक्लेश’

सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : देशातील महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी भूविकास चौकातील हुतात्मा स्मारकासमोर ‘आत्मक्लेश आंदोलन’ केले. वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप करत या कारवाईबद्दलही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

देशातील शिक्षण व्यवस्थेत वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. या प्रकारांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा केंद्र सरकारने त्यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून बेमुदत उपोषण केले. वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आत्मक्लेश आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले.

युवक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणारी कोणतीही व्यवस्था स्वीकारली जाऊ नये. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करून विद्यार्थीकेंद्रित व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या आंदोलनात शिवाजी जाधव, महारुद्र तिकुंडे, मोहन शिंदे, सुशांत मोरे, हणमंत शिंदे, कैलास कुंभार, महेंद्र बाचल, भारत जगताप, ॲड. मंगेश महामुलकर, एकनाथ सकपाळ, गुलाब बनसोडे, सादिकअली बागवान, गणेश अहिवळे, प्रशांत जाधव, प्रज्वल तिकुंडे, भारत रावळ, संदीप जाधव, विनोद कदम, दत्तात्रय जाधव, धनंजय कदम आणि सागर भोगावकर सहभागी झाले होते.

error: Content is protected !!