फाउंड्रीच्या धगधगत्या भट्टीत उडी; कामगाराचा मृत्यू

वाई एमआयडीसीतील धक्कादायक घटना; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई एमआयडीसी परिसरातील एका फाउंड्री कंपनीत शनिवारी (ता. १८) पहाटे ४२ वर्षीय कामगाराने सुरू असलेल्या मेटल भट्टीत उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुर्गा रोहिता प्रधान (वय ४२, मूळ रा. राजाबासा, ता. टेटटांगर, जि. सिंहभूम, झारखंड; सध्या रा. वाई एमआयडीसी परिसर) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाई पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फाउंड्रीमध्ये काम सुरू असताना प्रधान यांनी अचानक सुरू असलेल्या मेटल भट्टीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच तेथील सहकारी कामगारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र भट्टीतील अत्यंत उच्च तापमानामुळे त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने व पुरावे गोळा केल्याची माहिती आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून झारखंडमधील त्यांच्या नातेवाइकांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

प्रधान हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आत्महत्येमागील कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिस पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!