सातारा क्लब फोरमच्या चौकशीची मागणी

सरकारी जागेत अग्निवीर भरती केंद्र उभारा : सुनील काळेकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील शासन मालकीची जागा ताब्यात घेऊन तेथे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षा तसेच अग्निवीर भरती केंद्र उभारावे. त्याचबरोबर ‘सातारा क्लब, फोरम’कडे जागेचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा आरोप करत भाडेपट्टा, बांधकाम परवानगी आणि आर्थिक व्यवहारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सातारा शहराध्यक्ष सुनील काळेकर यांनी केली आहे. मागण्यांवर १० ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत काळेकर यांनी पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन दिले असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सातारा शहर पोलिसांना दिल्या आहेत. निवेदनानुसार, सातारा येथील सी. स. नं. ५१५ व ५१६ ही शासन मालकीची जागा सन १८९५ मध्ये तत्कालीन ‘युरोपियन क्लब’ला ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. हा करार १९९४ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही या जागेत ‘सातारा क्लब’चा कारभार सुरू राहिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यानंतर ‘सातारा क्लब, फोरम’ या नावाने नव्याने संस्था नोंदविताना शासनाची संमती अथवा ना-हरकत घेण्यात आली नसल्याचा आरोप काळेकर यांनी केला आहे. भाडेपट्ट्याचे नूतनीकरण होण्यापूर्वीच जागेचे हस्तांतरण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला असून, या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाची परवानगी न घेता नगरपालिकेची दिशाभूल करून बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित बांधकाम परवानगीची फेरतपासणी करून नियमभंग आढळल्यास ती रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

क्लबच्या जागेतील काही भाग खासगी व्यावसायिकांना भाड्याने देणे, त्यावरील मुद्रांक शुल्क, सभासदांकडून आकारण्यात येणारे शुल्क व वस्तू व सेवा कर याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सभासदांना कच्च्या पावत्या देऊन अधिकृत बिले दिली जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विदेशी मद्यविक्रीसाठी आवश्यक परवानग्या तसेच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत संबंधित विभागांनी तपासणी करावी आणि क्लबच्या आवारात जुगार सुरू असल्याच्या आरोपाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी काळेकर यांनी केली आहे.

या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच शासनाने ही जागा ताब्यात घेऊन तिचा सार्वजनिक हितासाठी वापर करत तेथे स्पर्धा परीक्षा आणि अग्निवीर भरती केंद्र उभारावे, अशी मागणी काळेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!