मला मारहाण झाल्याचे वृत्त निराधार : नागेश पाटील

हॉटेलमध्ये धुडगूस घालणाऱ्या मद्यधुंद युवकांविरुद्ध तक्रार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील नगरपालिका परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याचे वृत्त निराधार असून वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला वाद आणि मारामारी थांबविण्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मद्यधुंद युवकांनी आपल्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित युवकांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास नागेश पाटील हे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर नगरपालिका परिसरातील एका फास्ट फूड हॉटेलमध्ये अल्पोपहारासाठी थांबले असता तेथील कर्मचारी आणि काही मद्यधुंद युवकांमध्ये जोरदार वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. त्या वेळी हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते; मात्र संबंधित युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणीही पुढे येऊन हस्तक्षेप करण्याचे धाडस करत नव्हते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नागेश पाटील यांनी तातडीने सातारा शहर पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाद अधिक चिघळत असल्याचे पाहून त्यांनी स्वतः पुढे होऊन मध्यस्थी करण्याचा आणि सुरू असलेला हिंसक प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संबंधित मद्यधुंद युवकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत झटापट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

काही वेळातच सातारा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेतले असून नागेश पाटील यांनीही त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेबाबत भूमिशिल्पशी बोलताना नागेश पाटील म्हणाले, एखाद्या व्यक्तीला सर्वांसमोर मारहाण होत असताना कोणीही मदतीला पुढे येत नव्हते. त्यामुळे मी सर्वप्रथम पोलिसांना कळविले. मात्र, तोपर्यंत मारामारी सुरूच असल्याने मी स्वतः पुढे जाऊन ती थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यात गैर काय होते? माझ्याशी झटापट झाली; मात्र मला मारहाण झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही.

दरम्यान, या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हस्तक्षेप करताना नागेश पाटील हे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत, याची तेथील मद्यधुंद युवकांना अथवा उपस्थित अनेकांना कल्पना नव्हती. कोणत्याही पदाचा आव न आणता सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला हिंसक प्रकार थांबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रथम पोलिसांना माहिती देत कायद्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यानंतर स्वतः पुढे सरसावत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांनी संयम आणि प्रसंगावधान राखत परिस्थिती हाताळली.

या संपूर्ण घटनेत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने केवळ बघ्याची भूमिका न घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्याचे दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला हिंसक प्रकार थांबविण्यासाठी त्यांनी दाखविलेले प्रसंगावधान, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी याची परिसरात चर्चा होती. सातारा शहर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

error: Content is protected !!