बेंदराचा गुलाल मिरवून ‘सोन्या’ अनंताच्या प्रवासाला!

सणादिवशीच बैलाचा मृत्यू; बावधनवर शोककळा

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जीवापाड जपलेल्या लाडक्या बैलाला बेंदराच्या दिवशी सजवले… पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्याची मिरवणूक काढली… ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या मंदिरापर्यंतचा सोहळाही उत्साहात पार पडला; मात्र मिरवणुकीनंतर घरी परतताना सूरज ऊर्फ काका कदम यांच्या ‘बारका सोन्या’ या खिलार बैलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला. चार वेळा बावधनचे ऐतिहासिक बगाड ओढणाऱ्या या बैलाने ऐन बेंदरादिवशीच अखेरचा श्वास घेतल्याने कदम कुटुंबासह संपूर्ण बावधनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बावधनला खिलार बैलांचा मोठा पारंपरिक वारसा लाभला आहे. येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची बगाड यात्रा जगप्रसिद्ध असून, या यात्रेत बगाड ओढणाऱ्या बैलांना विशेष मान असतो. काका कदम यांचा ‘बारका सोन्या’ याच परंपरेतील देखणा आणि ताकदवान खिलार बैल होता. त्याने तब्बल चार वेळा ऐतिहासिक बगाड ओढले होते. त्यामुळे कदम कुटुंबापुरताच नव्हे, तर गावातील बैलप्रेमींमध्येही त्याच्याविषयी विशेष जिव्हाळा होता.

कदम यांच्या दावणीला मोठा सोन्या, रामा, खंड्या, बलमा आणि बारका सोन्या असे पाच बैल आहेत. बगाड यात्रेच्या काळात त्यांच्या घरासमोर खास सजावट करून या बैलांना बांधले जाते. बेंदरानिमित्त सोमवारी सकाळी पाचही बैलांना अंघोळ घालून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले. शिंगांना रंगरंगोटी, नवीन दोर आणि पारंपरिक साज चढवून गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली.

श्री काळभैरवनाथ मंदिरातील मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर बैलांना घरी नेण्यात येत होते. त्याचवेळी ‘बारका सोन्या’ला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. काही वेळापूर्वीच मिरवणुकीत दिमाखात चालणारा आपला लाडका बैल डोळ्यांसमोर कोसळल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, बावधनने यंदाही फटाकेमुक्त बेंदूर साजरा करून तालुक्यासमोर आदर्श ठेवला. फटाक्यांच्या आवाजामुळे बैल बिथरून सैरावैरा धावण्याचे प्रकार घडतात. त्यातून बैलांसह मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून येथील बैलमालकांनी फटाके न वाजविण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गुलालाची उधळण करत उत्साहात बेंदूर साजरा करण्यात आला.

बावधनचा बैलपोळा पाहण्यासाठी पुणे, कर्नाटकसह राज्याच्या विविध भागांतून हजारो बैलप्रेमी येतात. शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ शेतीकामातील पशू नसून कुटुंबातील सदस्य आणि वर्षभर कष्टात साथ देणारा साथीदार असतो. त्यामुळे ‘बारका सोन्या’च्या अचानक जाण्याने कदम कुटुंबाबरोबरच खिलारप्रेमी आणि ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे.

error: Content is protected !!