दरड कोसळल्याने केळघर घाटातील वाहतूक बंद

ढिगारा हलवणाऱ्या जेसीबीवरही कोसळली आफत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात सोमवारी (ता. २७) सायंकाळी मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. काळा कडा परिसरात रस्त्यावर मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा आल्याने सातारा, मेढा आणि महाबळेश्वर यांच्यातील वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद झाला. दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच जेसीबीवर पुन्हा दरड कोसळून तो दरीच्या दिशेने घसरला. चालक अझरुद्दीन याने प्रसंगावधान राखून वेळीच उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

केळघर घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, त्यामुळे घाटातील डोंगरकडे धोकादायक बनले आहेत. सोमवारी सायंकाळी काळा कडा परिसरात मोठी दरड थेट रस्त्यावर कोसळली. दगड-मातीच्या प्रचंड ढिगाऱ्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांसह सह्याद्री ट्रेकर्सचे सदस्यही घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील दगड-माती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच डोंगरावरून आणखी एक मोठी दरड अचानक जेसीबीवर कोसळली. त्यामुळे जेसीबी दरीच्या दिशेने घसरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चालक अजरुद्दीन याने क्षणाचाही विलंब न करता उडी घेत स्वतःचा जीव वाचविला.

या घटनेनंतर दरड हटविण्याचे काम अधिक जोखमीचे बनले आहे. संततधार पावसामुळे डोंगरकड्यावरून आणखी दगड अथवा माती कोसळण्याची शक्यता असल्याने मदतकार्य करताना विशेष खबरदारी घेतली जात आहे. रस्त्यावरील संपूर्ण ढिगारा हटवून मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केळघर घाटात याच महिन्यात पावसामुळे यापूर्वीही दरड कोसळून मेढा-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आता पुन्हा महाकाय दरड कोसळल्याने पावसाळ्यातील केळघर घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!