एफडीएची कारवाई; १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

दहिवडी, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण तालुक्यातील बिदाल येथे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करून विक्रीसाठी साठवून ठेवलेला १८ हजार ४८६ रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. एकूण ८ किलो ६२८ ग्रॅम वजनाचा हा साठा असून, याप्रकरणी अमित राजेंद्र खरात (रा. खरात वस्ती, बिदाल, ता. माण) याच्याविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास बिदाल येथील खरात वस्तीवर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध प्रकारचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर एफडीएच्या पथकाने संपूर्ण साठा जप्त केला.जप्त केलेल्या साठ्यामध्ये विविध कंपन्यांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा समावेश आहे. त्याचे एकूण वजन ८ किलो ६२८ ग्रॅम असून किंमत १८ हजार ४८६ रुपये असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी ओंकार शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ मधील विविध तरतुदींसह भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला वडूज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पुरवठ्याची साखळी रडारवर
दरम्यान, बिदालसारख्या भागात हा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू नेमका कुठून आला, त्याचा पुरवठा कोणी केला आणि कोणत्या मार्गाने हा माल येथे पोहोचला, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे तपास केवळ जप्त साठा आणि संबंधित संशयितापुरता मर्यादित न राहता त्यामागील पुरवठा साखळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या तपासातून आणखी कोणाची नावे पुढे येतात, याकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.
You must be logged in to post a comment.