स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १३ लाखांचा टँकर हस्तगत, दोघे अटकेत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाडेगाव (ता. फलटण) येथील शेती संशोधन केंद्राजवळून १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर चोरला आणि त्याची विक्री करण्यासाठी थेट ग्राहकाचा शोध सुरू केला; मात्र हाच प्रयत्न दोन संशयितांच्या अंगलट आला. लिंबखिंड परिसरात टँकर विक्रीसाठी ग्राहक शोधत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा टँकर हस्तगत करण्यात आला असून, लोणंद पोलिस ठाण्यात दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लागला.
अनिकेत सुनील लकडे (वय २५, रा. लकडे वस्ती, पाडेगाव, ता. फलटण) आणि शुभम विनोद जैस्वाल (वय १८, रा. दगडे वस्ती, नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या चोरीत आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राच्या कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा. लि., फलटण या कंपनीचा पाण्याचा टँकर उभा करण्यात आला होता. २६ जुलै रोजी सायंकाळी सात ते २८ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान १३ लाख रुपये किमतीचा हा टँकर चोरीला गेला. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली पथक तपासाला लागले.
दरम्यान, बुधवारी (ता. २९) पोलीस निरीक्षक घोडके यांना लिंबखिंड परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर दोन जण निळ्या-पांढऱ्या रंगाचा टँकर घेऊन त्याच्या विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच दातीर यांच्या पथकाने लिंबखिंडकडे धाव घेतली.सर्व्हिस रोडवर एमएच १२ डीटी ३१३९ क्रमांकाचा टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर पोलिसांच्या नजरेस पडला. टँकरजवळ स्प्लेंडर दुचाकीवर दोन जण बसले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे टँकरबाबत विचारणा केली असता तो आपलाच असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, टँकरची कागदपत्रे मागताच दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संशय बळावल्याने पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी केली.
चौकशीत हा टँकर आणखी एका साथीदाराच्या मदतीने पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राजवळून चोरल्याचे समोर आले. चोरीचा टँकर लिंबखिंड परिसरात आणल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी ग्राहकाचा शोध सुरू असल्याची माहितीही चौकशीत पुढे आली. पोलिसांनी १३ लाख रुपये किमतीचा टँकर हस्तगत केला. त्यामुळे टँकर चोरीनंतर अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फरांदे, पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी तसेच पोलिस अंमलदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, हसन तडवी, अमोल माने, राकेश खांडके, सुजित भोसले, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, नवनाथ कदम, मनोज जाधव, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, अरुण पाटील, शिवाजी भिसे, स्वप्नील दोंड आणि विजय निकम यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
You must be logged in to post a comment.