शिरवळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुरूषोत्तम जाधव यांचेकडून स्वागत

ना.फडणवीस यांचेशी खंडाळा तालुक्यातील विविध विकास प्रश्नांवर चर्चा

खंडाळा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दि. ३ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, शिरवळ येथील हेलिपॅडवर खंडाळा तालुक्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. दरम्यान, ना.फडणवीस यांच्याशी जाधव यांनी खंडाळा तालुक्याच्या विविध विकासाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांचा दौरा मुख्यत: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित सावित्रीबाई जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी होता. हा कार्यक्रम नायगाव, ता. खंडाळा येथे ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खंडाळा तालुक्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत खंडाळा तालुक्याच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली. या चर्चेत मुख्यत: नायगाव मांढरदेवी रस्ता, खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील १४ गावांचा पाणी प्रश्न, तसेच गावडेवाडी, शेखमीरवाडी, वाघोशी येथील तीन उपसा सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंबंधीची मागणी करण्यात आली. तसेच वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामे आणि इतर प्रलंबित प्रश्न यावर चर्चा झाली. यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रश्नांचे वेगाने निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आणि लवकरच या प्रश्नांचा निपटारा करू असेही स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री.जाधव यांना दिलेले आश्वासन खंडाळा तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक असून त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होणार आहे.

‘उमेद’ प्रदर्शनातील महिलांच्या स्टॉल्सचे कौतुक

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात एक विशेष बाब म्हणजे ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत प्रदर्शन होय. या प्रदर्शनामध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंवर आधारित विविध स्टॉल्स होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करून त्या स्टॉल्सना भेट दिली आणि महिलांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी पुरूषोत्तम जाधव यांच्या भगिनी सौ. सरस्वती निकम, रा. मुंगसेवाडी ता.वाई यांच्या स्टॉललाही त्यांनी भेट दिली व स्टॉलचे कौतुक करत, महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने या प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा खंडाळा तालुक्यातील महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठीही महत्त्वाचा ठरला आहे, तसेच ग्रामीण भागातील जीवनोन्नतीसाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!